
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. विधानभवनाच्या लॉबीत कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली आणि शर्टही फाडले. या राड्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांनाच ताब्यात घेतले. यामुळे आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि पोलीस स्थानक दणाणून सोडले. यावेळी रोहित पवार यांचा पारा चांगलाच चढला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता याबाबत रोहित पवार यांनी स्पष्टीकरणही दिले असून रात्री नक्की काय घडले हे सांगितले आहे.
पोलीस स्थानकातील व्हायरल व्हिडीओबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, आम्ही चार तासांपासून नितीन देशमुख यांचा शोध घेत होतो. पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नव्हते. इकडून तिकडे फिरवत होते. आम्ही आधी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गेलो, तिथून आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो. तिथल्या एपीआय यांना काय चालले ते कळत नव्हते. ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. हे लोकप्रतिनिधीसोबत असे वागत असतील तर गरीबांसोबत कसे वागत असतील?
आमचे एवढेच मत आहे की, दोन आमदार, एक माजी मंत्री समोर असतानाही पोलीस नीट माहिती देत नव्हते. मग्रुरी दाखवत होते. लोकप्रतिनिधींसोबत असे वागत असतील, हातवारे करून बोलत असतील तर या लोकांनाही कुठेतरी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कार्यकर्त्याचे टेन्शन होते आणि आवाज वाढला. याला दमदाटी म्हणत असाल तर कार्यकर्त्यासाठी, सामान्य लोकांसाठी पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल शेवटपर्यंत ठेऊ, असेही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांचा पारा चढला, पोलीस स्थानकामध्ये राडा
पोलीस स्थानकामध्ये पारा का चढला? रोहित पवारांनी सांगितलं रात्री नक्की काय घडलं…
वाचा सविस्तर – https://t.co/NfW1b4EyL0 pic.twitter.com/7o5CvVGWKe— Saamana Online (@SaamanaOnline) July 18, 2025
दरम्यान, नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्याने गुरुवारी रात्री जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या केला. आरोपीला मोकाट सोडून पिडीताला अटक करणं हे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून सत्तेतून आलेली ही मस्ती आहे. पण सरकारच्या या जुलमाविरोधात आम्ही लढत राहू, असे रोहित पवार म्हणाले.
विधीमंडळ आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करुन त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं आ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यासोबत सरकारविरोधात आंदोलन केलं. आरोपीला मोकाट सोडून पिडीताला अटक करणं हे चोराला सोडून संन्याशाला… pic.twitter.com/dYYtqdcI6t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2025