आपण कुणाच्या कडेवर आहात! आमदार रोहित पवार यांचा गोपीचंद पडळकरांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवार हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत. त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कोणाच्या खांद्यावर बसतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कोणाच्या कडेवर आहात, असे मी विचारणार नाही. मात्र, आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना फेसबुक पोस्टद्वारे लगावला आहे.

आमदार पडळकर हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना, तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण, या मतदारसंघात गेली 25 वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळे इथे 25 वर्षांचा बॅक लॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झाले नाही; तरी मी विकासाचा ही दीर्घ बॅक लॉग भरून काढण्यासाठी काम करीत आहे.