तिसरी आघाडी स्थापन करण्याचे आदेश दिल्लीवरून, अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार यांचा टोला

एका गटाला तिसरी आघाडी स्थापन करण्याचे आदेश दिल्लीवरून आले आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी लगावला आहे. तसेच या आदेशाला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक गट सरकारविरोधात आंदोलन करत आहे असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

मालवणात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. या प्रकरणी महाविकास आघाडीने महायुती सरकारवर टीका केली. आता महायुती सरकारचे घटकपक्ष असलेल्या अजित पवार गटानेही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ मुक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर टोला लगावत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहून म्हटले आहे की,

महिलावरील वाढते अत्याचार, प्रत्येक कामात दलाली खाण्याची सरकारची प्रवृत्ती यामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली असून याचा भाजपने प्रचंड धसका घेतला आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतविभाजन करण्यासाठी सरकारमधील एका गटाला तिसरी आघाडी स्थापन करण्याचे दिल्लीवरून आदेश दिल्याचे तसेच या दिल्लीच्या आदेशाला मूर्त रूप देण्यासाठी एक गट सरकारविरोधात आंदोलन करत असल्याची चर्चा आहे.

असो, आंदोलन केल्याने त्या गटाला तिसरी आघाडी स्थापन करायचा मार्ग मोकळा होईल, परंतु दलाली खाण्याच्या ज्या पापाचे भागीदार आहात, त्या पापातून मुक्ती मात्र कदापि मिळणार नाही हे मात्र लक्षात असू द्या…! असेही रोहित पवार म्हणाले.