प्रचार संपल्यानंतरही घरोघरी जाऊन प्रचार म्हणजे लक्ष्मीदर्शनासाठी दिलेली अधिकृत मंजुरीच; रोहित पवार यांचा निवडणूक आयोग-भाजपवर निशाणा

महापालिका निवडणुकांचा प्रचार संध्याकाळी ५.३० वाजता संपला. पण त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १३ ते १५ जानेवारीपर्यंत पत्रके न वाटता घरोघरी जाऊन प्रचार करण्यास उमेदवारांना परवानगी दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिली. अशा प्रकारचा निर्णय हा पहिल्यांदाच होत असून हा निर्णय म्हणजे घरोघरी जाऊन लक्ष्मीदर्शनासाठी दिलेली अधिकृत मंजुरीच आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासासाठी भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात साटंलोटं झाल्यांचं यावरून दिसतंय. पण स्वाभिमानी मतदार हा डाव नक्की हाणून पाडतील, असा विश्वास रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला आहे.