
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होण्यापूर्वी काही लोकांनी बारामती विमानतळाची रेकी केली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. याप्रकरणी सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद बोलवून अजितदादांचा अपघात आणि एएआयबीच्या चौकशी अहवालाबाबत अनेक मुद्दय़ांवरून टीका केली. दादांच्या अपघातापूर्वी गोझीबावी येथील त्या जागेची काही लोकांनी रेकी केली होती असे स्थानिक सांगतात, त्याची चौकशी केली पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
व्हीएसआरला वाचवा-वाचवीचे काम सुरू आहे
व्हीएसआर कंपनी किंवा डीजीसीएच्या विरोधात आपण नाही, पण व्हीएसआरला या प्रकरणात कुणीतरी वाचवत आहे. तो वाचवा-वाचवीचा कार्यक्रम एका मोठय़ा व्यक्तीमुळे होतोय, असे रोहित पवार म्हणाले. विमान कंपनीचा वकील आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीचे वडील यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवून दाखवले. या रेकॉर्डिंगमध्ये ‘वैमानिकाने चूक केली, विमान धडकवलं, काय करणार आता? दृश्यमानता कमी होती, त्यांना दिसलं नाही. रन वेच्या डाव्या बाजूला जाऊन त्यांनी विमान धडकवलं,’ असे वकील म्हणत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
अॅरो ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल करा
व्हिजिबिलिटी नसतानाही दादांचे विमान लॅण्ड करण्यात आले. अॅरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे अॅरो ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
शिंदेंचे विमान इराणने माघारी धाडलं होतं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीएसआर कंपनीच्या विमानानेच 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान स्वित्झर्लंडच्या दावोसला गेले होते. त्यांचे विमान परवानगीशिवाय इराणच्या हवाई हद्दीत शिरले होते. इराणच्या हवाई संरक्षण दलाने विमानाला माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आणि न परतल्यास पाडण्याचा इशारा दिला होता, असे रोहित पवार यावेळी म्हणाले. त्या विमानाला आवश्यक परवानग्याही नव्हत्या, त्यामुळे विमान बहरीनला परत फिरले आणि परवानग्या घेऊन झुरिकला गेले, असे ते म्हणाले.
तिथे झाडच नाही मग झाडाला विमान कसं धडकलं
अपघातासंदर्भातील रोहित पवार यांची ही तिसरी पत्रकार परिषद होती. एएआयबीने प्राथमिक तपास अहवालासाठी एक महिना लावला तरी या अहवालात अनेक चुका आहेत. या अहवालात विमान जमिनीवर आदळण्याआधी झाडांवर आदळले असे नमूद केले, मात्र घटनास्थळाच्या व्हिडीओत कुठेही झाडे दिसत नाहीत. केवळ झुडपे आहेत. काहीतरी द्यायचे म्हणून हा रिपोर्ट देण्यात आलेला असावा. चौकशी अहवालात कुणी चौकशी केली त्यांचे नावच नाही, असे रोहित पवार म्हणाले.
बोइंग 786 खरेदीत घोटाळा; प्रफुल्ल पटेलांच्या चौकशीचे काय झाले?
रोहित पवार यांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. एअर इंडियाच्या बोईंग 786 विमानाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. कारण त्या बोईंग विमानात गडबड असल्याचे बाहेर आले असते तर एअर इंडियाला सर्वच बोईंग विमाने बाहेर काढावी लागली असती असे रोहित पवार म्हणाले.





























































