हे वागणं बरं नव्हं…कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ते रमी खेळताना दिसत आहेत. रोज 8 शेतकरी जीवन संपवताहेत आणि कृषीमंत्री रमी खेळताहेत, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ प्रथम दर्शनी विधिमंडळातील असल्याचे दिसत आहे. यावरून आता माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

“सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?”, असा सवाल रोहित पवार यांनी एक्सवर केला आहे.