तुटपुंजी मदत जाहीर करुन सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळलं – रोहीत पवार

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करुन महायुती सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचंच काम केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट X च्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीवरुन महायुती सरकारवर  निशाणा साधला आहे.

रोहीत पवार यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटले आहेत की, संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीला या सरकारने पद्धतशीरपणे बगल दिलीच पण अतिवृष्टीने पूर्णतः उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला हात देण्यासाठी हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत देण्याऐवजी NDRF च्या निकषानुसारच तुटपुंजी मदत जाहीर करुन तोंडाला अक्षरशः पानं पुसली. राणा भीमदेवी थाटात 31 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली. पण त्याचा हिशोब केला तर शेतकऱ्यांचा झालेला खर्चही वसूल होणार नाही.

बागायतीसाठी शेतकऱ्यांचा हेक्टरी 70 हजारपेक्षाही अधिक खर्च झाला असताना हे सरकार केवळ हेक्टरी 31,500 रु. मदत देणार आहे. हंगामी बागायतीसाठी 27,500 रु. तर जिरायतीसाठी 18,500 रु. शेतकऱ्याच्या हाती टेकवले जाणार आहेत. अशी तुटपुंजी मदत जाहीर करुन या सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचंच काम केल्याची टीका रोहीत पवार यांनी केली आहे.