
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता. यासाठी अजितदादा यांच्या निधनाच्या 18व्या दिवशी म्हणजे 16 फेबुवारी 2026 रोजी पटेल, तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
अजित पवार गटाच्या आमदारांना तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना विश्वासात न घेताच 16 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले. त्यामध्ये कार्याध्यक्षांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील, असे नमूद करण्यात आले होते. या पत्राच्या माध्यमातून अजितदादांकडे असलेले पूर्ण अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे घेण्यात आले. यातून त्यांना पक्षाचा ताबा मिळवायचा होता हेच स्पष्ट होते. मात्र ज्या वेळी सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी ते त्यांच्या अध्यक्ष पदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती निवडणूक आयोगाला केल्याचा दावा रोहित पवार यांनी विधान भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना केला.
भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे दिलेले विधान आणि त्यानंतर त्यांनी ते ‘चुकीने बोललो’ असे सांगणे, हा घटनाक्रम संशयास्पद वाटतो. पण आधीच नेत्यांमध्ये ठरलं होतं की, पक्षाचा कंट्रोल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती, असे रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा काकी, राजकारण लय वंगाळ!
आता सुनेत्रा काकींना एवढेच मला सांगायचे आहे की, राजकारण लय वंगाळ झालेले आहे. अवतीभवती जी लोकं आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
दबावामुळे जय पवार यांची पत्रकार परिषद नाही
तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही असं मला वाटतं. माझं जयशी बोलणं झालं नाही. अधिवेशनात अजितदादांच्या अपघाताबद्दल एक-दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार बोलला नाही. कारण तटकरे आणि पटेल यांनी सांगितलं होतं की, दादांच्या अपघाताबद्दल अजिबात बोलायचं नाही, असे रोहित पवार म्हणाले.
क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करा
हा संपूर्ण कट आधीच रचला गेला होता का, आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सर्व घडवून आणले गेले का, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
घराबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’
अजितदादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न झाला होता. कदाचित नाशिकचाच भोंदूबाबा तिथे काळी जादू करण्याच्या प्रयत्नात होता. पक्षावर ताबा मिळविण्यासाठी हे केले जात होते का, असा संशय असल्याचे रोहित पवार म्हणाले.



























































