शक्तीपीठमध्ये दलालीचं भगदाड पडलंय, नितीन गडकरींनी राज्य सरकारचे कान टोचावे; रोहीत पवार यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यासाठी प्रति किमी 107 कोटी खर्च होतो आहे, त्यावरून रोहीत पवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. याबाबत रोहीत पवार यांनी ट्विट केले आहे.

नितीन गडकरी साहेबांच्या पुणे-बंगळुरू या 8 पदरी ग्रीनफील्ड हायवेसाठी प्रति कि.मी. 1 कोटी रूपये खर्च येतोय तर दुसरीकडे राज्य सरकारच्या 6 पदरी शक्तीपीठ महामार्गासाठी प्रति कि.मी. 107 कोटी खर्च कसा काय? राज्य सरकार 30000 कोटी अतिरिक्त का खर्च करत आहे?, असा सवाल रोहीत पवार यांनी केला आहे.

तसेच एकीकडं निधी नाही म्हणून कर्जमाफी, सामाजिक न्यायाच्या योजना रखडल्या आहेत. निधीअभावी सरकार दिलेल्या आश्वासनापासून पळ काढत असून दुसरीकडं शक्तिपीठ महामार्गाची सक्ती करून दलालांना दलालीची शक्ती देतंय का? याचाच अर्थ शक्तीपीठ मध्ये दलालीचं पाणी मुरतच नाही तर याला मोठं भगदाड पडलंय. याबाबत आता गडकरी साहेबांनीच राज्यसरकारचे कान टोचायला हवेत, असेही रोहीत पवार यांनी म्हटले आहे.