अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही; रोहित पवारांचा ‘VSR’ कंपनीच्या मालकावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खळबळजनक आरोप केले आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओचा संदर्भ देत रोहित पवार यांनी ‘VSR’ कंपनीच्या मालकाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.

या संदर्भात रोहित पवार यांनी ‘विमान हवेत असताना पायलट झोपला होता’ या जय पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओचा दाखला दिला आहे. या व्हिडिओमध्ये VSR कंपनीचा मालक रोहित सिंग स्वतः पायलट असूनही विमान हवेत असताना झोप काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार म्हणाले, ‘विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा माझा बंधू जय पवार याने शेअर केलेला हाच तो व्हिडिओ! असा जीवघेणा निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तीवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी रोहित सिंग याच्या राजकीय संबंधांवरही बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, रोहित सिंग हा आज राज्यातील सर्वच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झाला आहे का? त्याच्या लग्नाला केंद्रातील मंत्री आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते उपस्थित होते. याच बड्या नेत्यांच्या वरदहस्तामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न सगळीकडून सुरू आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

DGCA च्या भूमिकेवर शंका

नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) आतापर्यंतच्या हालचाली पाहता, त्यांच्याकडून रोहित सिंगवर खरोखर कारवाई होईल का? याबाबत रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र, चौकशी यंत्रणांनी कितीही दिरंगाई केली तरी अजितदादांच्या अपघाताला जबाबदार असलेल्यांना कदापि सोडणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला आहे.