अजितदादांचा घातपात; चौकशीत गडबड केली तर सर्वांच्या फायली बाहेर काढीन! रोहित पवार यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालात थोडी जरी गडबड आढळली तर सर्वांच्या फायली बाहेर काढीन, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला.

विधिमंडळ अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनासाठी जाण्यापूर्वी विधान भवन आवारात रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आठवडाभरात येण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मोठमोठे नेते, व्यावसायिक आणि अनेक मोठी नावे या प्रकरणात आम्हाला समजली आहेत. सत्तेत असलेल्या नेत्यांचे ‘व्हीएसआर’ विमान पंपनीशी कशा प्रकारचे संबंध आहेत त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. चौकशी अहवालात कोणत्याही प्रकारची गडबड आढळली तर त्या नेत्यांची नावे आपण जाहीर करू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी

पारदर्शकपणे झाली पाहिजे, अशी महाराष्ट्राची इच्छा आहे. आपल्याकडे या अपघातासंदर्भात अनेक पुरावे आणि कागदपत्रे आहेत. विमानाच्या जळलेल्या ब्लॅक बॉक्सचा पह्टो आहे आणि ब्लॅक बॉक्सचे किती नुकसान झाले होते त्याचा अंदाजही आम्हाला आहे, असे रोहित पवार म्हणाले.

सीआयडीला महाराष्ट्राकडून तपास दिला गेला आहे. पण गेल्या महिनाभरात सीआयडीने काय केलेय? सीसीटीव्ही पॅमेरे तरी ताब्यात घेतलेत का? दोन प्रमुख पायलट का बदलण्यात आले? खरंच ट्रफिक होते का? चौकशी संस्था सर्व पुरावे व्यवस्थितपणे गोळा करताहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी केला. अॅरो व्हाट्सअॅप ग्रुपबद्दल चौकशी करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

सीबीआयकडे 7075 प्रकरणे प्रलंबित

सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी इच्छा अनेकांची व्यक्त केली आहे. सीबीआयकडून चौकशी होत असेल तर चांगलेच आहे. पण सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या अहवालानुसार सीबीआयकडे आधीच 7075 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांचा अजून निकाल लागलेला नाही. त्यातील 2660 प्रकरणे अशी आहेत ज्यांचा तपास गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.