हिंदुस्थानी खेळाडूंचा जागतिक दरारा कायम! आयसीसी क्रमवारीत रोहित-विराटची मोहोर, बुमरा-जाडेजाची धाकधूक वाढली

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत हिंदुस्थानच्या स्टार खेळाडूंचा जागतिक क्रिकेटवरील दरारा अबाधित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजा यांनी फलंदाजी, गोलंदाजी व अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसी रँकिंगमध्ये हिंदुस्थानचे वर्चस्व ठसठशीतपणे अधोरेखित केले आहे.

वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये हिंदुस्थानचे चार खेळाडू आहेत. रोहित शर्मा अव्वल स्थानावर विराजमान असून विराट कोहली दुसऱया क्रमांकावर आहे. युवा कर्णधार शुभमन गिल पाचव्या, तर श्रेयस अय्यर दहाव्या स्थानावर आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हिंदुस्थानी फलंदाजांचा दबदबा अजूनही कायम आहे.

कसोटी गोलंदाजी क्रमवारीत हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा 879 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर ठाम आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 843 गुणांसह दुसऱया स्थानी पोहोचला असला तरी बुमरापेक्षा तो अजूनही 36 गुणांनी पिछाडीवर आहे. मेलबर्न कसोटीत एकूण 36 विकेट पडल्या, त्यापैकी 35 विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना क्रमवारीत मोठा फायदा झाला.

मेलबर्न कसोटीत इंग्लंडला या दौऱयातील पहिला विजय मिळवून देण्यात जोश टंगने मोलाचा वाटा उचलला. दोन्ही डावांत मिळून सात विकेट घेणाऱया टंगला 13 स्थानांची झेप मिळाली असून तो आता 573 गुणांसह 30 व्या क्रमांकावर आहे. गस ऍटकिन्सनने नव्या चेंडूवर ट्रव्हिस हेडचा महत्त्वाचा बळी घेत एकूण तीन विकेट मिळवल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने चार स्थानांची झेप घेत 698 गुणांसह संयुक्त 13 वे स्थान पटकावले.

कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हिंदुस्थानच्या रवींद्र जाडेजाचे ‘नंबर वन’चे सिंहासन अजूनही शाबूत आहे. 455 रेटिंग गुणांसह तो अव्वल स्थानी असून, दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन (344) आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स (316) हे अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी असले तरी जाडेजापेक्षा खूपच मागे आहेत.

कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा हॅरी ब्रूक तीन स्थानांची झेप घेत 846 गुणांसह दुसऱया क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड आणि केन विल्यमसन यांना मागे टाकले असून, अव्वल जो रूटपेक्षा तो अद्याप मागे आहे. मेलबर्न कसोटीत 41 आणि नाबाद 18 धावांची खेळी करत ब्रूकने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.