रांची कसोटीत रोहित शर्माचे मालिकेतील तिसरे दमदार शतक

3157

रांची येथील तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी गाजवला. कॅगिसो रबाडा व एनरीक नॉर्टजे यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर हिंदुस्थानची अवस्था 3 बाद 39 धावा अशी झाली असताना सलामीवीर रोहित शर्मा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी 185 धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे हिंदुस्थानला दिवसअखेर 3 बाद 224 धावा करता आल्या. रोहित शर्माचे मालिकेतील तिसरे व कारकीर्दीतील सहावे शतक (नाबाद 117 धावा) आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद 83 धावा शनिवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आल्यामुळे 58 षटकांचाच खेळ होऊ शकला.

शानदार फलंदाजी

रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी 185 धावांची अभेद्य भागीदारी केली. दोघांनी यामध्ये शानदार फटकेबाजी केली. रोहित शर्माने 164 चेंडूंत 4 षटकार व 14 चौकारांसह नाबाद 117 धावांची, तर अजिंक्य रहाणेने 135 चेंडूंत 1 षटकार व 11 चौकारांसह नाबाद 83 धावांची खेळी साकारली.

दृष्टिक्षेपात

  • रोहित शर्माने या कसोटी मालिकेत 17 षटकार फटकावत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. एका मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतलीय. याआधी वेस्ट इंडीजच्या शिमरोन हेथमायर याने 2018-19 साली बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 15 षटकार चोपून काढले होते.
  • रोहित शर्माने यावेळी सुनील गावसकरांच्या विक्रमाचीही बरोबरी केली. एका मालिकेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त शतके झळकावणारा रोहित शर्मा हा हिंदुस्थानचा सुनील गावसकर यांच्यानंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे.
  • रोहित शर्माने कसोटी कारकीर्दीत सहावे शतक झळकावले. त्याने आपले शतक षटकार मारून पूर्ण केले.षटकार मारत सर्वाधिक शतके करणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. त्याने सहा वेळा असे केले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या