
टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी एका विक्रमाची नोंद केली. त्याने कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. पहिल्या डावात आक्रमक खेळी करत त्याने 176 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावातही त्याने शतक ठोकत 127 धावा केल्या. सलामीवीर म्हणून पहिली कसोटी खेळणाऱ्या रोहित शर्माने लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत स्वतःला सिद्ध केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या-सहाव्या क्रमांकावर अयशस्वी ठरल्यानंतर रोहितला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. त्या संधीचं रोहितनं धमाकेदार खेळी करत सोनं केलं. रोहितने पहिल्या सामन्यात दीडशतक झळकावले आणि दुसऱ्या डावातही त्याने तुफान फलंदाजी करत शतक ठोकले. दोनही डावात शतक झळकावणारा रोहित शर्मा दुसरा सलामीवीर ठरला. याआधी सुनील गावसकर यांनी हा पराक्रम केला होता. हिंदुस्थानकडून एकाच सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्यांच्या यादीतही त्याने स्थान मिळवले. या आधी गावसकर यांनी तिनदा, द्रविडने दोन वेळा तर विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी एकदा दोन्ही डावात शतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. त्यात आता रोहितच्या नावाचाही समावेश झाला आहे. सलामीवीर म्हणून खेळताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यासोबतच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखं द्विशतक ठोकलं. सलामीवीर म्हणून 200 धावांची खेळी करणारा रोहित शर्मा आठवा फलंदाज ठरला. या यादीत विरेंद्र सेहवाग 388 डावांसह अव्वल स्थानी आहे. त्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर 342, सुनील गावसकर 286, शिखर धवन 243, सौरव गांगुली 237, गौतम गंभीर 228, के. श्रीकांत 217 यांनी 200 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत.
रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत 10 षटकार ठोकले आहेत. याप्रकारे रोहित शर्माने टीम इंडियाकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने 4 षटकार ठोकले आहेत. याबरोबरच तो एका कसोटी सामन्यात हिंदुस्थानकडून सर्वाधिक 10 षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. या आधी हा विक्रम माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंह सिद्धूच्या नावावर होता. सिद्धूने 1994 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना एका डावात 8 षटकार ठोकले होते. याप्रमाणे रोहित शर्माने नवजोत सिंह सिद्धूचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे. हिंदुस्थानने पहिल्या डावात 7 गडी गमावून 502 धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावाची घोषणा केली होती. सलामीवीर मयंक अग्रवालने पहिल्या डावात द्विशतक ठोकले आहे. त्याने पहिल्या डावात 215 धावा केल्या.























































