
आजकाल अनेक लोक व्यावसायिक आहारतज्ज्ञ किंवा न्यूट्रिशनिस्ट नसतानाही सोशल मीडियावर आरोग्य आणि फिटनेसवर सल्ले देतात. तरुण पिढी त्यांना फॉलो करते, हे एक भितीदायक चित्र आहे, अशी चिंता ‘फिट इंडिया आयकॉन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी व्यक्त केली. चर्चगेट येथे ‘फिट इंडिया’ वरील एका परिसंवादात ते बोलत होते.
मी गेली ३० वर्षे फिटनेसमध्ये आहे. पण आजकाल जी सहजता सोशल मीडियावर आली आहे, ती पाहता कोण फिटनेसचा सल्ला देऊ शकेल, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असण्याची गरज आहे, असे मतही रोहित शेट्टीने मांडले.
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने हिंदुस्थानी खेळाडूंच्या बदललेल्या मानसिकतेवर भर दिला. पूर्वी हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये मानसिक कणखरतेचा अभाव जाणवत असे, मात्र विराट कोहलीने ही मानसिकता पूर्णपणे बदलली. आज हिंदुस्थानी खेळाडू अत्यंत तंदुरुस्त आहेत आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे, असे ती म्हणाली. तर
क्रिकेटपटू हरभजन सिंगने चीन आणि जपानचे उदाहरण देत तंदुरुस्तीचे महत्त्व पटवले. पालकांनी मुलांच्या फिटनेसकडे लक्ष देऊन त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची गरज आहे, असे तो म्हणाला.
याच कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी तंदुरुस्तीला देशाच्या विकासाशी जोडले. या चर्चासत्राला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे याही उपस्थित होत्या.




























































