क्लब, बोट हाऊसमुळे रोइंगच्या सरावात अडथळा

260

रोइंग हा वॉटर स्पोर्ट म्हणून ओळखला जातो. दत्तू भोकनळ, स्वर्णसिंग, बजरंगलाल ठक्कर, कसम खान, इंदरपाल सिंग हे पाच खेळाडू या खेळातील हिंदुस्थानची ओळख. इतर खेळांच्या तुलनेत या खेळाला हिंदुस्थानात म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. अर्थात खेळाची व्याप्ती, खेळण्यासाठी लागणारी जागा, प्रेरणा होऊ शकेल अशी त्या खेळातील व्यक्ती, खेळासाठी लागणारे वातावरण, खेळासाठी लागणारा खर्च या सर्व गोष्टींवरही खेळाची देशातील परिस्थिती अवलंबून असते, पण रोइंग या खेळामध्ये दत्तू भोकनळसारख्या मराठमोळ्या खेळाडूने हिंदुस्थानला थोडी तरी आशा दाखवलीय. कोरोना व लॉकडाऊनमध्ये खेळाच्या सरावाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

याप्रसंगी आशियाई रोइंग फेडरेशन रोइंग फॉर ऑलचे चेअरमन गिरीश फडणीस यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत या खेळाशी निगडित असलेल्या बाबींवर दृष्टिक्षेप टाकला. यावेळी ते म्हणाले, जगातील इतर देशांमध्ये प्रत्येक खेळाडू आपली स्वतःची बोट घेऊन सरावाला जातो, पण हिंदुस्थानात क्लब हाऊस, बोट हाऊस असल्यामुळे कोरोनाच्या काळात खेळाडू सरावापासून दूर राहताहेत. कारण सरकारकडून दोन्ही ठिकाणे खुली करण्यात आल्यास तिथे गर्दी होईल. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र याचा फटका खेळाडूंना बसत आहे.

खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन

लॉकडाऊनमध्ये रोइंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. कोचेसकडून ट्रेनिंग प्रोगाम्स राबवण्यात आले. यामध्ये खेळाडूंना फिटनेस, डाएट, मेंटल या सर्व बाबींची माहिती देण्यात आली. साईकडूनही मार्गदर्शनासाठी पाऊल उचलण्यात आले, असेही गिरीश फडणीस यावेळी म्हणाले.

ट्रेनिंग पद्धत सुधारायला हवी

रोइंगमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड हे देश खूप पुढे आहेत. हिंदुस्थानला रोइंगमध्ये झेप घेता येईल. आपले खेळाडू कोणत्याही बाबींमध्ये मागे नाहीत तसेच हिंदुस्थानात सुविधाही चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण ट्रेनिंगची पद्धत बदलायला हवी. त्यानंतर आपण प्रगतिपथावर आरूढ होऊ, असे गिरीश फडणीस यांनी आवर्जून सांगितले.

ऑलिम्पिक पात्रता फेरी रद्द

कोरोनाचा फटका संपूर्ण जगालाच बसला. मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे कोरिया येथे होणारी ऑलिम्पिक पात्रता फेरीही रद्द करण्यात आली. हिंदुस्थानचा संघ दोन प्रकारांत ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार होता. ओपन सिंगल व लाईट वेट डबल्स या दोन रोइंग प्रकारांत हिंदुस्थानी खेळाडू सहभागी होणार होते. आता टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंना सरावासाठी आणखी संधी मिळेल, असे गिरीश फडणीस यावेळी म्हणाले.

प्रगती होतेय, पण ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळणार नाही

रोइंगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी प्रगती केलीय. आशियाई स्पर्धेत यश संपादन करतायत, ऑलिम्पिकमध्ये अद्याप पदक जिंकता आलेले नाही, पण वाटचाल चांगली सुरू आहे. गेल्या पाच ऑलिम्पिकमध्ये 16व्या स्थानावरून 12व्या स्थानावर हिंदुस्थान पोहचले आहे. पुढील दोन ते तीन ऑलिम्पिकनंतर हिंदुस्थानला पदक मिळेल, पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा बाळगता येणार नाही, असे स्पष्ट अन् परखड मत गिरीश फडणीस यांनी यावेळी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या