
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
ठरलेल्या कालमर्यादेत शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा क्रांती मोर्चाने तब्बल 21 दिवस परळी मध्ये केलेले क्रांतिकारी ठिय्या आंदोलन राज्यभर गाजले. समाजाच्या विविध मागण्या शासनाने आजपर्यंतही विचारात घेतल्या नाहीत, यामुळे परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा रोखठोक आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक परळी तहसील समोर अमरण उपोषणास बसले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देत असताना भूतकाळाप्रमाणे दिशाभूल न करता ठोस आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नावांमध्ये मराठा नावाचा उल्लेख करावा व कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत करून बँकांना कर्जवितरण सक्तीचे करावे, 21 दिवस चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान शहीद झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करावी, आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात उतरलेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन शासनाला 18 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान चाललेल्या आंदोलनादरम्यान दिले होते.
उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत या सर्व मागण्या 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. दिलेल्या कालमर्यादेत एकही मागणी पूर्ण न झाल्याने परळीत पुन्हा तहसील कार्यालयासमोर आज दि. 25 नोव्हेंबर पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. परळी तेवढे दिवस तीव्र आंदोलन करूनही शासनाला जाग आली नाही.मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आज पासून शेकडो मराठा बांधवांसह परळी तहसील समोर आमरण उपोषणास बसले आहेत.
प्रशासनाचा दबाव
जुलैमध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर आज परळी मध्ये पुन्हा रोखठोक आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेस फिरत होते.याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या होत्या.आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी परळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्याच्या अगोदर पोलिसांचा मोठा फौज फाटा करण्यात आला होता. परंतु या दबावाला न जुमानता मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते तहसील समोर अमरण उपोषणास बसले





























































