रोखठोक – मोठ्या घसरगुंडीवर देश; पोकळ खांबांवर नेतृत्व! गुजरातमधील प्रचंड बँक घोटाळा कोणाचा?

गुजरातमधील 22 हजार कोटींच्या बँक घोटाळ्याने देश हादरला. हा घोटाळा नेहरूंच्या जमान्यात झाला नाही. तो आपल्या सगळ्यांच्या नाकासमोर झाला. महाराष्ट्रात दोन-पाच लाखांचे व्यवहार तपासणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा गुजरातमध्ये बँका लुटल्या जात असताना गप्प का बसल्या?

हर्षद मेहताने बँकेचा आणि शेअर बाजारातील सुमारे चार हजार कोटींचा घोटाळा केला तेव्हा देश हादरला होता. आपल्या देशात बँकांना अशा प्रकारे लुबाडले जाऊ शकते हे तेव्हा समजले. त्यानंतर बँका सराईतपणे लुटण्याचे ‘राष्ट्रकार्य’ अनेकांनी केले. निवडणुकांना पैसा लागतो. त्यामुळे राज्यकर्ते प्रत्येक योजनेत पैसा जमा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पैसा खाण्याचे उद्योग सार्वत्रिक होतात. आता बँका आणि आर्थिक संस्था हे लुटमारीचे सगळ्यात मोठे साधन बनले आहे. पंजाब नॅशनल बँकेचे 5 हजार कोटी रुपये बुडवून नीरव मोदी व मेहुल चोक्सी परदेशात पळून गेले. विजय मल्ल्याचे 6 हजार कोटींचे प्रकरण संपले नाही. मुंबईत पीएमसी बँकेचे प्रकरण लुटमारीचेच आहे. मुंबै बँकेत अनेक राजकीय नेत्यांनी कोटय़वधींची कर्जे घेतली. ती फेडली नाहीत. त्या कर्जबुडव्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली तर भारतीय जनता पक्षाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा, जो 22 हजार कोटींचा आहे, तो गुजरातमध्ये घडला.

सरळ लुटमार

‘देशातील सगळ्यात मोठा बँक घोटाळा,’ असे वर्णन एबीजी शिपयार्ड कंपनीच्या बाबतीत घडले. एबीजी शिपयार्ड कंपनीने 2012 ते 2017 पर्यंत वेगवेगळ्या 28 बँकांतून व्यापार, उद्योगाच्या नावावर 22,842 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कंपनीने याच पैशांतून संपत्ती खरेदी केली. मोठ्या रकमा परदेशात पाठवल्या. बँकांचे लोन अकाऊंट जुलै 2016 मध्ये एनपीए घोषित केले गेले. 8 नोव्हेंबर 2019 ला 28 बँकांतर्फे प्रथमच सीबीआयमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणात एलआयसीचीही 150 कोटींची लूट या कंपनीने केली. आयसीआयसीआय, आयडीबीआय, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक अशा सहा बँकांचे 17,734 कोटी रुपये लुटले जात होते व सरकारी तपास यंत्रणा गुजरातमध्ये स्वस्थ बसल्या होत्या. सुरत दहेज परिसरात कंपनी जहाज निर्मिती व दुरुस्तीचे काम करीत होती. प्रत्यक्षात कंपनीचे संचालक मंडळ बँकांचे पैसे हडप करण्यात गुंतले होते. मराठीतले प्रख्यात सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी यावर लोकांची भावना मोजक्या शब्दांत मांडली.

ते म्हणतात, ‘‘22 हजार कोटी? म्हणजे नेमके किती शून्य? एवढा मोठा बँक घोटाळा करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केले. साधे घर घ्यायचे म्हटले तर सामान्य माणसाला हे बँकवाले एवढे पेपरवर्क करायला लावतात! त्यात जे घर आहे तेसुद्धा तारण ठेवतात. नेमके ‘अच्छे दिन’ आहेत कोणाचे?’’ शिंदे जे म्हणाले तेच सामान्यांचे मत आहे.

सगळेच साथी!

अशा मोठ्या आर्थिक घोटाळ्यात सगळेच एकमेकांचे साथीदार असतात. एबीजी कंपनीच्या बाबतीत तेच घडले. 2018 मध्ये डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल अहमदाबादसमोर हे प्रकरण आले तेव्हा देना बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या तीन वेगवेगळ्या तक्रारींवर तीन वेगवेगळे निकाल देण्यात आले. ट्रिब्युनलने बँकांना एबीजी शिपयार्ड कंपनीकडून 13,975 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. निकालात असेही सांगितले की, कंपनीची चल-अचल संपत्ती जप्त करून विका आणि वसुली करा. 2017 पासून 2022 पर्यंत काहीच घडले नाही. या काळात कंपनीचे संचालक पसार झाले, बँका बुडाल्या व बरीचशी संपत्ती परदेशात वळवली. हे सरळ सरळ मनी लॉण्डरिंग होते, पण मुंबईत भाजप विरोधकांच्या मागे लांडग्यासारखी धावणारी ‘ईडी’ वगैरे तपास यंत्रणा गुजरातमधील अशा अनेक घोटाळ्यांकडे मूक दर्शक बनून पाहत राहिली. महाराष्ट्रात दोन-पाच लाखांच्या व्यवहारावर लक्ष ठेवणाऱ्या या केंद्रीय तपास यंत्रणा गुजरातमधील 22 हजार कोटींचा घोटाळा घडत असताना कोणाच्या आदेशाने गप्प होत्या?

गरीबांची जप्ती!

शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कर्ज फेडता येत नाही तेव्हा बँकेचे लोक त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात. घर व घरातील सामान जप्त करतात, पण 22 हजार कोटींचे कर्ज बुडविण्याच्या गुन्हय़ात असे करण्यापासून यंत्रणांना कोणी रोखले? घाटय़ात असलेल्या एबीजी कंपनीने 14 फेब्रुवारी 2006 ला 100 कोटींचे बँक क्रेडिट मिळविले होते. त्यातून एसबीआयकडून 80 कोटींचे कर्ज घेतले. हळूहळू हेच क्रेडिट लिमिट 2008 पर्यंत 1558 कोटींपर्यंत पोहोचले. अशा तऱहेने या बुडणाऱ्या जहाजाने तळ गाठण्याआधी वेगवेगळ्या 28 बँकांकडून कर्ज घेतले. चार वर्षे हा घोटाळा उघडपणे सुरू होता व जनतेचा पैसा वाचविण्यासाठी चौकीदाराने काहीच हालचाल केली नाही.

कोणी काय लुटले?

नरसिंह राव यांच्या काळात हर्षद मेहताने मोठा बँक घोटाळा केला. मोदींच्या काळात आतापर्यंत 5,35,000 कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले आहेत. गेल्या 75 वर्षांत हिंदुस्थानातील जनतेच्या पैशांची एवढय़ा मोठ्या प्रमाणावर कधीच लूट झाली नव्हती, असे आता श्री. राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काही हजार कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे करून दोन हजारांवर व्यापारी व उद्योगपती देश सोडून गेले आहेत. त्यातील बहुसंख्य गुजरातमधील व्यापारी आहेत. एबीजी घोटाळ्यातील सर्व आरोपी पळून गेले आहेत. ते पळून जाईपर्यंत प्रकरण उघड होऊ दिले नाही. मुंबईत पीएमसी बँक घोटाळ्यावर भाजप नेते बोलत असतात, पण याच घोटाळ्यातील एक सूत्रधार राकेश वाधवान याच्याकडून भाजपच्या बनेल-बोलघेवडय़ा नेत्यांनी जमिनीचे व्यवहार केले व त्यावर शेकडो कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प उभारले. बँका व शेअर बाजारात रोज घोटाळे होत आहेत. त्या घोटाळ्यांतही भाजपचेच नेते कसे सहभागी आहेत याचा खुलासा शेखर वैष्णव यांनी केला आहे.

आता ‘एबीजी’ शिपयार्डच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड ऋषी अगरवाल आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध काय व या घोटाळ्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी डोळेझाक का केली ते पाहायला हवे. भारतीय जनता पक्ष हा उद्योगपतींच्या देणग्यांवर श्रीमंत झाला. त्या श्रीमंतीत ‘एबीजी’ शिपयार्ड  आणि ऋषी अगरवालचे योगदान किती हे तपासायला हवे. हेच अगरवाल 2013 च्या ‘व्हायब्रण्ट गुजरात’च्या अनेक कार्यक्रमांत त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वावरताना सगळ्यांनी पाहिले. 2013 साली याच अगरवालला मोदी दक्षिण कोरियाला व्यापारी शिष्टमंडळाबरोबर घेऊन गेले. अगरवालची लुटमार 2011 पासून सुरू होती असे भाजपचे सांगणे असेल तर मोदी व त्यांचा परिवार त्यांना घेऊन मिरवत का होता? या सगळ्या प्रकरणात ईडी, सीबीआयची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. सामान्य माणसांना धमक्या देणारे ‘ईडी’ वगैरे लोक अगरवाल सारख्यांसमोर नांग्या टाकतात किंवा सेटलमेंट करतात!

परदेशात पैसा!

भ्रष्टाचाराने सचोटीला गिळावे असे मामले रोज समोर येत आहेत. काळा पैसा परदेशातून आणू असे कालपर्यंत बोलणारे आता गप्प झाले व त्यांच्याच काळात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे पैसे परदेशात गेले. ‘एबीजी’ शिपयार्ड हे त्याचे सगळ्यात ताजे उदाहरण. भारतीय जनता पक्षाची सर्वाधिक संपत्ती आहे. त्यांच्या बँक खात्यातच साडेचार हजार कोटी जमा आहेत. उद्योगपती सत्ताधारी पक्षांना भरभरून देतात. पुन्हा ज्या काळ्या पैशांसाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्था छापे टाकतात, तोच काळा पैसा ते निवडणुकांत वापरतात! एबीजीतल्या घोटाळ्याचा किती पैसा कोणाच्या खात्यात गेला ते कधीच कळणार नाही.

एका मोठ्या घसरगुंडीवर देश उभा आहे, तर नेतृत्व पोकळ खांबांवर उभे आहे!

@rautsanjay61

[email protected]