रोखठोक: चला, हिंदू-मुसलमान खेळूया!

rokhthok२०१९ जवळ येईल तसा हिंदू-मुसलमान ‘खेळा’स बहर येईल. काँग्रेस हा मुसलमान पुरुषांचा पक्ष आहे काय, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारला. मुसलमान बायका व पुरुष अशी फाळणी त्यामुळे झाली. हिंदू-मुसलमान हा राजकीय पोटापाण्याचा खेळ बनला आहे. त्यापेक्षा अयोध्येत राम मंदिर उभे करा!

हिंदू विरुद्ध मुसलमान असे वातावरण निर्माण करून २०१९ ला काठावरचे बहुमत मिळवावे अशा घडामोडींना भारतीय जनता पक्षात वेग आलेला दिसतोय. अयोध्येत राम मंदिर हिमतीने उभे करायला हवे होते, पण आता निवडणुकीपूर्वी अयोध्येत एखाद्या पूजा-अभिषेकाचा राजकीय कार्यक्रम उरकून देशात हिंदू विरुद्ध मुसलमान असे वातावरण निर्माण केले जाईल. २०१४ साली देशभरातील मुसलमानांनी श्री. मोदी यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केले. आता तसे वातावरण दिसत नाही. त्यामुळे काँग्रेससह इतर सर्व पक्ष हे मुसलमानधार्जिणे व आपला पक्ष हिंदूवादी असे सिद्ध करण्याची धडपड सुरू आहे. ‘विकास’ या महत्त्वाच्या विषयावरून लक्ष उडविण्यासाठी पुन्हा जात-धर्माचाच आधार घेऊन निवडणुका लढवल्या गेल्या तर मोदी यांचा जागतिक नेतृत्वाचा तो पराभव ठरेल. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर उसळली असल्याचे सांगण्यात आले. फ्रान्सला मागे टाकून आपल्या अर्थव्यवस्थेने पाचवा क्रमांक पटकावला. २०२२ पर्यंत आपण तिसऱया क्रमांकावर जाऊ. मोदी यांनी जगभरात जी भ्रमंती केली हा त्याचाच परिणाम असेल तर निवडणुका सरळ विकास व लोकांच्या प्रश्नांवर लढवाव्यात. धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण करून त्यात तेल ओतण्याचे काम कोणी का करावे?

मुसलमान पुरुषांचा पक्ष
‘तिहेरी तलाक’ला निर्बंध घालण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने केले. मोदी सरकारने ते अमलात आणले. काँग्रेसने काही सुधारणा सुचवून हे विधेयक राज्यसभेत रोखले. त्यावर ‘चर्चा’ व्हायला हवी तसे घडले नाही. राहुल गांधी हे मुस्लिम पुरुषांच्या बाजूने आहेत. त्यांना मुस्लिम महिलांविषयी आस्था नसल्याचे विधान आपल्या पंतप्रधानांनी केले. भाजप मुस्लिम महिलांच्या बाजूने आणि काँग्रेस पुरुषांच्या बाजूने अशी नवी फाळणी आता केली. म्हणजे घराघरात भांडणाची ठिणगी टाकली. काँग्रेस हा मुसलमानांचा आणि भाजप हा हिंदूंचाच पक्ष असेल तर निदान हिंदूंचे तरी संपूर्ण हित पाहावे व हिंदू तरुणांना नोकऱया द्याव्यात. तेवढी तरी गरिबी दूर होईल, असे श्री. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

फैसला करा!
आपल्या देशातील मुसलमानांचे नक्की काय करायचे याचा फैसला मोदी सरकारने करायला हवा. देशातील मुसलमानांना फक्त राजकीय तणाव निर्माण करण्यासाठी वापरायचे व हिंदूंची मते मिळवायची आणि इतरांनी हिंदू आतंकवादाचे भय दाखवून मुसलमानी मतांवर डल्ला मारायचा. हे सर्व आपण कधी थांबवणार आहोत? मुसलमानांनी ‘चाँद-तारा’ असलेला हिरवा झेंडा वापरू नये. हा झेंडा पाकिस्तानमधील मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व करतो अशी तक्रार घेऊन मुस्लिम संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. हे आधीच मोदींच्या हिंदुत्ववादी सरकारने करायला हवे होते. मदरशांत शिकायला जाणाऱया मुलींनी कोणते कपडे घालावेत यावर उत्तर प्रदेश सरकारने फर्मान काढले व नंतर मागे घेतले. मुसलमानांच्या सर्व धार्मिक सुट्टय़ा व सवलती रद्द केल्या. हे सर्व भाजपच्या ताब्यातील एका राज्यात झाले, मग केंद्र सरकारने देशपातळीवर हाच निर्णय का घेऊ नये?

सक्तीचा दणका
एक तर मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कंबर कसा नाहीतर चीनमध्ये सक्तीचे प्रयोग झाले तसे निर्णय घ्या. तेवढी हिंमत आमच्या राज्यकर्त्यांत आहे काय? चीनच्या पश्चिमेस दाट मुस्लिम लोकसंख्या असलेल्या लिंझिया प्रांतात मुस्लिमांवर कडक निर्बंध कम्युनिस्ट सरकारने लादले आहेत. लिंझिया प्रांतास चीनमधील ‘छोटी मक्का’ असे म्हटले जाते. या प्रांतातील १६ वर्षांखालील मुलांना धार्मिक कार्यात भाग घेता येणार नाही. मशीद वा मदरशांत जाऊन नमाज पढता येणार नाही. यापुढे नवे इमाम नेमले जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर प्रत्येक मशिदीवर चीनचा राष्ट्रध्वज लावणे सक्तीचे केले आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून मशिदीत दिली जाणारी बांग बंद करण्याचे आदेश चीन सरकारने दिले आहेत. धार्मिक शिक्षणासाठी व कुराणातील ‘आयते’ समजून घेण्यासाठी सुट्टीच्या दिवसांत हजारो विद्यार्थी मशिदीत प्रवेश घेतात. कुराणातील धडे देणाऱया अशा मशिदींना आता टाळे लावण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सरकारतर्फे सांगण्यात आले आहे की, कुराणावर यासाठी बंदी आणली आहे की विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्ष अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त लक्ष द्यावे. ‘इस्लाम खतरे में’च्या आरोळ्यांमुळे चीनची अंतर्गत सुरक्षा खतऱ्यात आली. चीनमध्ये फुटीरतावाद व आतंकवाद वाढला असे तेथील राज्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे देश वाचविण्यासाठी इस्लामवरच बंदी आणली. चीनचे राज्यकर्ते धर्माचे राजकारण करीत नाहीत व धर्माचे अवडंबर उभे करून निवडणुका लढवत नाहीत. हिंदुस्थान जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. त्यापेक्षा त्याने ‘चीन’चा आदर्श ठेवून राज्यकर्ता व्हावे. मुसलमानांचा धार्मिक उन्माद संपवा. त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणा. नाहीतर हिंदुराष्ट्र घोषित करून ‘लिंझिया’ प्रांताप्रमाणे भेंडीबाजारास टाळे लावा. निवडणुका आल्या की दरवेळी होणारा हिंदू-मुसलमानांचा खेळ आता थांबवायला हवा.

अर्थात, हा खेळ थांबला तर अनेकांचे राजकारण थांबेल. तो आता राजकीय पोटापाण्याचा खेळ झाला आहे!

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या