रोखठोक: हेमराज आणि 40 वीर जवान!

rokhthokपुलवामा हल्ल्यानंतर देशभक्तीची लाट उसळली. दहशतवादी हल्ला, युद्ध व दंगली झाल्याशिवाय अशी लाट का उसळू नये? 40 जवान शहीद झाले, पण गेल्या चार वर्षांत सीमेवर आमचे जवान सातत्याने प्राण गमावीत आहेत. त्यांची कुटुंबे उघडय़ावर पडतात व मदतीच्या घोषणा हवेत विरतात. तुम्हाला तो हेमराज आठवतोय का?

पुलवामातील हल्ल्यानंतर देशात राष्ट्र ‘भावना’ उचंबळून आल्या. हे नेहमीच घडते. वीर जवानांची चिंता सगळय़ांनाच आहे. मदतीचा ‘ओघ’ सुरू असतो. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर असे ‘सेलिब्रिटीज’ वीर जवानांसाठी मोठय़ा रकमांची मदत करतात. त्यांचे कौतुक होते. 2013 साली कश्मीर सीमेवर हेमराज हा जवान शहीद झाला. त्याला पाक रेंजर्सनी निर्घृणपणे मारले. त्यानंतर हेमराजच्या कुटुंबास 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली गेली, पण ही संपूर्ण रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना आजपर्यंत मिळालेली नाही. एक घर सरकारने दिले ते रिकामे करण्यासाठी आता नोटीस आली आहे. हेमराजच्या पत्नीस पेट्रोल पंप आणि सरकारी नोकरी देण्याचा वायदा केला होता. त्यातले काहीच पूर्ण झाले नाही. हेमराजची पत्नी तिच्या तीन मुलांसह सरकारदरबारी उंबरठे झिजवत आहे. निराशेशिवाय तिच्या पदरी काहीच पडत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर जसा देशभक्तीचा माहोल निर्माण झाला आहे तसाच माहोल हेमराजच्या बलिदानानंतरही निर्माण झाला होता. बदल्याच्या आरोळय़ा ठोकल्या जात होत्या. आता पुन्हा चाळीस ‘हेमराज’ व त्यांची कुटुंबे तोच आक्रोश करीत आहेत.

सैन्य पोटावर चालते
पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले चाळीस जवान हे सामान्य कुटुंबातले आहेत. सैन्य पोटावर चालते व चालत राहणार हे निर्विवाद सत्य कुणीही नाकारणार नाही. त्या सैनिकांची दुःखेही इतरांसारखीच आहेत. पुलवामातील शहीद अजित कुमार आजाद हा उत्तर प्रदेशातील उन्नावचा. त्याला दोन लहान मुली आहेत. ईशा वय 8 आणि श्रेया वय 6. दोन्ही मुलींना डॉक्टर व्हायचे होते. 10 फेब्रुवारीस अजित कुमारची सुट्टी संपली व तो जम्मूस निघाला. त्याने दोन्ही मुलींना जवळ घेतले व सांगितले, ‘‘मन लावून अभ्यास करा.’’ अजित कुमार आपल्या मुलींना आता कधीच भेटू शकणार नाही. अजित कुमारच्या अंतिम यात्रेची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्यात स्थानिक खासदार साक्षी महाराज व आमदार पंकज गुप्ता यांच्या चेहऱयावरील हास्य संताप आणणारे आहे.

राजकारण सुरू
जवानांच्या चितांची आग विझली नाही तोच देशात बेशरम राजकारण सुरू झाले. दहशतवाद व सैनिकांच्या बलिदानाच्या घटना गेल्या चार वर्षांत सर्वात जास्त वाढल्या हे सत्य लपवता येणार नाही. 2013-14 सालात दहशतवाद व पाक हल्ल्यांच्या घटना घडल्या. जवानांना मरण पत्करावे लागले. तेव्हा मनमोहन सरकारला जबाबदार धरणारे आज सत्तेवर आहेत. त्या वेळची भाजप नेत्यांची सर्व वक्तव्ये आजही देशाच्या स्मरणात आहेत. हे सर्व लोक आज देशात सत्तेवर आहेत. प्रख्यात पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी एक माहिती समोर आणली आहे, त्यानुसार गेल्या पाच वर्षांत जम्मू-कश्मीरातील दहशतवादी हल्ल्यात 176 टक्क्यांनी वाढ झाली.

सुरक्षा दलांच्या जवानांच्या हत्येत 94 टक्के वाढ झाली. स्थानिक तरुण दहशतवादी बनत असल्याच्या संख्येत 260 टक्क्यांनी वाढ झाली. हे आकडे चिंताजनक आहेत. का मरत आहेत हे लोक? सैनिक मरत आहेत व आम्ही देशभक्तीच्या गर्जना सोशल मीडियावर करीत आहोत. कश्मीरात हल्ले सुरू असतानाच सिक्कीमच्या चीन सीमेवर मेजर निशांत डोग्रा मरण पावले. त्यांचे वडील रमेश चंद्र यांनी अस्वस्थ होऊन सांगितले, ‘‘सिक्कीमच्या योंगडी भागात माझा मुलगा मेजर निशांत डोग्रा याने प्राण गमावला आहे. चीनच्या सीमेवर तो आहे, तेथे गेल्या आठ दिवसांपासून वीज नाही. जनरेटर काम करीत नाही. सैनिकांना किमान सुविधा तरी द्या.’’ आम्ही जवानांच्या मृत्यूनंतर जयजयकार करतो, मात्र त्यांना जिवंतपणी किमान सुविधा तरी द्या. पंतप्रधान सांगतात, बेरोजगारी हटवली. म्हणजे काय? ते सांगतात, गेल्या 5 वर्षांत 27 लाख ‘ऑटो’ विकल्या. यावर एका भांडीवाल्याने सांगितले, ‘पंतप्रधानसाहेब, गेल्या पाच वर्षांत दोन कोटी चमचे-वाटय़ा आम्हीसुद्धा विकल्या आहेत. म्हणून देश उपाशी नाही असे सांगायचे काय? सैनिकांचा विषय सुरू आहे म्हणून गांभीर्याने बोलायला हवे. सैन्यातल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका बाप वाटत असतानाच पुलवामातील हल्ल्यात नवरदेव जवान शहीद झाल्याची बातमी आली. अमर जवान ज्योत सरकार व राजकारण्यांमुळे नव्हे, तर ती अशा बहादूर जवानांमुळे व त्यांच्या कुटुंबांमुळे अखंड तेवत आहे.

अमर जवान ज्योतीचे पावित्र्य कोणी जपायचे? हेमराजची कत्तल झाली तेव्हा राजकारण्यांनी घेतलेल्या भूमिकेचे काय झाले?

केंद्र सरकारने जाहीर करावे की, त्यांना आणखी किती बहाद्दर भारतीय सैनिकांचे बलिदान हवे आहे.- रविशंकर प्रसाद (6 ऑगस्ट 2013)

मोदी पंतप्रधान झाले तर पाकिस्तानी घुसखोरांची सीमा पार करण्याची हिंमतच होणार नाही. – अमित शहा (23 एप्रिल 2014)

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवायला हव्यात. – स्मृती इराणी

आज देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असते तर एव्हाना आमच्या फौजा लाहोरपर्यंत पोहोचल्या असत्या – गिरिराज सिंह (8 ऑगस्ट 13)

सहा जवानांच्या हत्या हे भयंकर आहे. देशाला व सैन्याला अपमान सहन करावा लागत आहे. कारण आमच्याकडे एक कमजोर आणि गोंधळलेले सरकार आहे – सुषमा स्वराज (8 ऑगस्ट 13)

Twitter- @rautsanjay61
Gmail – rautsanjay61@gmail.com