रोखठोक : ठाकरे अयोध्येत पोहोचले!

186

rokhthokअयोध्येत राममंदिरच होते याचे सगळे पुरावे न्यायालयासमोर आहेत. अयोध्येवर आतापर्यंत दहा वेळा मोगली हल्ले झाले, असंख्य हिंदू मारले गेले तरीही तेथील राममंदिराचा लढा शेकडो वर्षे संपला नाही. असा राममंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयास महत्त्वाचा वाटत नाही व सरकार राममंदिरासाठी कायदा बनवायला तयार नाही. रामप्रभू असे कात्रीत अडकले आहेत.

कडाक्याच्या थंडीत अयोध्येचे वातावरण तापले आहे. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत श्री. उद्धव ठाकरे हे रामाच्या अयोध्येत पोहोचलेले असतील. कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भक्त येतात व शरयू नदीत पहाटे 4 पासून डुबकी मारतात. हे सर्वसामान्य लोक आहेत. अयोध्येच्या चिंचोळ्या रस्त्यावर अशा सामान्य भक्तांच्या झुंडीच्या झुंडी वावरत आहेत. श्रीराम हा अशा सामान्य लोकांचा देव व या सामान्य लोकांनाच अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर हवे आहे. रामजन्मभूमीचा संपूर्ण परिसर सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणात आहे व अयोध्येतील प्रत्येक घडामोडीचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात रोज सादर केला जातो. ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या दारात श्रीराम मंदिर उभारणीची याचिका घेऊन भक्त उभे आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच आता सांगितले की, ‘‘राममंदिरापेक्षा अनेक महत्त्वाची कामे आमच्या समोर आहेत. राममंदिराची सुनावणी रोजच्या रोज तत्त्वावर घेता येणार नाही. राममंदिर महत्त्वाचे नाही.’’ या न्यायालयाच्या भूमिकेवर अयोध्येतील साधुसंतांमध्ये रोष आहे. त्यांचा रोष काय कामाचा? हिंदुस्थानचे ‘दैवत’ श्रीराम हे अयोध्येतील कैदखान्यात कसे बंदिवान होऊन उभे आहेत ते पाहायला जड जाते. बंदिवान रामाचे दर्शन आपण घेतो तेव्हा ‘हेच काय रामराज्य’ असा प्रश्न पडतो व संपूर्ण देश बंदिवान का झाला आहे ते कळते.

हल्ले परतवून लावले
रामजन्मभूमीचा लढा न्यायालयात सुरू आहे. बाबराने राममंदिर पाडले व मशीद उभी केली. ही मशीद पुन्हा 1992 साली कारसेवकांनी पाडली. त्यात शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता, पण रामजन्मभूमीवर हल्ला करणारा बाबर हा एकमेव मोगल आक्रमक नव्हता, तर दहा मोगल बादशहांनी आतापर्यंत अयोध्येवर हल्ले केले व प्रत्येक वेळी हिंदूंनी ते परतवून लावले. ‘रामचरितमानस’ रचणाऱ्या तुलसीदासांच्या कथेत मोगलांच्या हल्ल्यांचा उल्लेख नाही असा आक्षेप राममंदिरास विरोध करणारे घेतात. मंदिर तोडून मशीद उभारली यावर तथाकथित बुद्धिजीवी, कम्युनिस्ट विश्वास ठेवत नाहीत. रामायण एक ‘मिथक’ म्हणजे दंतकथा आहे. रामायण एक दंतकथा व रामायणाचा नायक ‘राम’ एक कल्पना असल्याचे सांगून एक भ्रम निर्माण केला जातो. त्यामुळे रामजन्मभूमी हा प्रकारच अस्तित्वात नसल्याचा त्यांचा दावा आहे. रामजन्मभूमी अस्तित्वात नसेल तर बाबरी मशीद उभारणारा बाबर आला कुठून? या बाबराचे थडगे आजही अफगाणिस्तानात आहे व तिथे त्याच्याविषयी कुणालाच फारशी माहिती नाही, पण हिंदुस्थानात रामापेक्षा हा बाबर महान ठरवला जात आहे. यासारखे हिंदुस्थानचे दुर्दैव ते कोणते?

तुलसी रामायण
‘रामचरितमानस’ तुलसीदासांनी लिहून पूर्ण केले तेव्हा ते 80 वर्षांचे झाले. त्यांचा उद्देश रामचरित्राचे वर्णन करणे इतकाच होता. त्यामुळे रामजन्मभूमीवरील मोगलांच्या हल्ल्यांचा संदर्भ त्यांनी दिला नसावा व न्यायालयात त्याच मुद्द्यांचा कीस सुरुवातीपासून काढला जात आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात रामजन्मभूमीवर युक्तिवाद सुरू झाला तेव्हा चित्रकूट निवासी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री रामभद्राचार्यजी महाराजांची साक्ष महत्त्वाची ठरली. या विषयातील तज्ज्ञ व अभ्यासक म्हणून त्यांना साक्ष देण्यास बोलावले. त्यांनी रामजन्मभूमी मंदिराबाबतचे साहित्यिक पुरावे सादर करून तुलसीदास यांना या प्रकरणात ओढणाऱ्यांची तोंडे बंद केली. तुलसीदासजींची एक महत्त्वाची रचना त्यांनी समोर आणली. त्यात रामजन्मभूमीवरील मोगली हल्ल्यांचे विदारक वर्णन केले.

तुलसीदास लिहितात,
मंत्र उपनिषद ब्रह्माण्हू बहु पुराण इतिहास।
जवन जराए रोष भरी करी तुलसी परिहास।।
सिखा सूत्र से हीन करी, बल ते हिंदू लोग।
भमरी भगाए देश ते, तुलसी कठिन कुयोग।।
सम्बत सर वसु बाण नभ, ग्रीष्म ऋतू अनुमानि।
तुलसी अवधहि जड़ जवन, अनरथ किये अनमानि।।
रामजनम महीन मंदिरहिं, तोरी मसीत बनाए।
जवहि बहु हिंदुन हते, तुलसी किन्ही हाय।।
दल्यो मीरबाकी अवध मंदिर राम समाज।
तुलसी हृदय हति, त्राहि त्राहि रघुराज।।
रामजनम मंदिर जहँ, लसत अवध के बीच।
तुलसी रची मसीत तहँ, मीरबांकी खाल नीच।।
रामायण घरी घंट जहन, श्रुति पुराण उपखान।
तुलसी जवन अजान तहँ, कइयों कुराण अजाण।।

तुलसीदासांच्या या दोह्याचा अर्थ असा की, ‘सूड, चीड, द्वेष यांनी खदखदणाऱ्या यवनांनी मंत्र, उपनिषद, वेद, पुराण आणि ब्राह्मण ग्रंथांना लाथाडून जाळून टाकले. हिंदूंच्या शेंडी, जानव्यांची विटंबना केली. त्यांची घरे उद्ध्वस्त करून त्यांना पळवून लावले. हातात तलवार घेऊन नराधम बाबर आला व त्याने हत्या केल्या. तो काळ अत्यंत भीषण होता. तुलसीदासांनी त्या भयंकर घटनांचा उल्लेख आपल्या दोह्यांत केला आहे. त्यांनी आपली पदे व दोहे ज्योतिषी शैलीत रचली. 1585 विक्रम संवत (सन 1528 ई)च्या ग्रीष्मकालात यवनांनी अत्याचाराचे टोक गाठले. रामजन्मभूमीवरील मंदिर नष्ट करून तिथे एक मशीद बांधली. त्याच वेळी प्रतिकार करणाऱ्या हिंदूंची हत्या केली. रामदरबारातील मूर्तींची तोडफोड करून जिथे राममंदिर होते तिथे मीर बाकीने मशीद बांधली. जिथे रामायण, श्रुती, वेद, पुराणांची प्रवचने होत असत, घंटा, भजनांचा गजर होत असे, तिथे अजानी यवनांचे अजान सुरू झाल्याचे वर्णन तुलसीदासांनी केले. हे सर्व आता न्यायालयात आहे, पण राममंदिर न्यायालयासाठी महत्त्वाचा विषय नाही.

राम कसा?
ज्या कारणांसाठी देशात निरंतर तणाव आणि संघर्ष सुरू आहे, ज्यासाठी गेल्या पाचशे वर्षांत शेकडो हिंदूंचे बलिदान झाले व रक्त सांडले तो विषय किरकोळ मानणारी न्यायव्यवस्था आमचे मुख्य खांब म्हणून उभी आहे. त्याग, पराक्रम, स्वाभिमान आणि लोकसंग्रह हे गुण रामचरित्रात प्रकर्षाने दिसून येतात. आनंद, दुःख, मोह, शोक, विरह, व्याकुळता या सर्व गोष्टी त्या प्रसंगानुसार त्याच्या चरित्रात दिसून येतात. विलक्षण संयम हा प्रभू रामाचा गुण. स्वतःच्या सामर्थ्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळेच मानव असूनही देव म्हणून त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे एवढे त्याचे व्यक्तिमत्त्व विशाल आहे. विनम्रता हा रामाचा अलंकार आहे. त्याचे सामर्थ्य पाहून देवता जेव्हा त्याचा गौरव करतात तेव्हा राम म्हणतो, ‘‘आत्मा ने मानुषं मन्य राम दशरथात्मजम्।’’ राम स्वतःला देव समजत नव्हता, पण आज माणसे स्वतःला विष्णूचे अवतार मानू लागली. एक मानव या भूमिकेतून वाल्मीकीने रामाचे चित्रण केले. याचे कारण देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस इत्यादी कोणाकडूनही तुझा वध होणे शक्य नाही असा वर रावणाला मिळालेला होता. मानवाला तो कस्पटासमान मानत असे. त्यामुळेच रावणाचा वध करण्यासाठी एखादी असामान्य व्यक्तीच निर्माण करणे आवश्यक होते. रामाच्या रूपाने ती झाली. राम सगळ्यांनाच आपला प्रिय भाऊ, सखा, तारणहार वाटतो. मुलगा वाटतो व तो कुटुंबाचा घटक वाटतो. त्याचे मंदिर व्हावे यासाठी देश एक होतो व मतदान करून मंदिर उभे करू शकेल असा विश्वास वाटणारे सरकार निवडून देतो. ते सरकारही राममंदिर उभे करत नाही तेव्हा तो रामजन्मभूमीवरील मीरबाकी, बाबर यापेक्षा सगळ्यात मोठा हल्ला ठरतो.

पक्षकारांची भीती नाही
राममंदिराचे निर्माण हे आता राजकीय हत्यार बनले. अयोध्येत माझा मुक्काम आहे व अनेक साधू, महंतांशी माझे बोलणे सुरू असते. लक्ष्मण किला प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे सगळ्यात प्रथम स्वागत केले व त्यांच्या सत्कारासाठी किल्ल्याचे मैदान दिले. तेव्हा अयोध्येतील सर्व प्रमुख साधुसंत उद्धव ठाकरे यांच्या नागरी सत्कारासाठी पुढे आले. राममंदिर निर्माण कार्यात दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचा अडथळा नसून हिंदू समाजातील राजकीय फुटीमुळेच मंदिर होऊ शकले नाही असे अयोध्येतील प्रमुख महंत म्हणाले. राममंदिर होऊ नये असे न्यायालयास सांगणारे इब्राहिम अन्सारी. ते बाबरीच्या बाजूचे प्रमुख पक्षकार. ते आजही अयोध्येत राहतात. त्यांच्या मुलालाही वाटते की, राममंदिर व्हावे. एकेकाळी हे अन्सारी अयोध्येत सायकलच्या टायरचे पंक्चर काढण्याचे काम करीत, पण 1992 नंतर रामलल्ला त्यांनाही ‘पावले’ व बरकत झाली. त्यांच्या दारात आज स्वतःच्या तीन गाड्या उभ्या आहेत. फैजाबाद कोर्टात दावा दाखल झाला तेव्हा अन्सारी यांच्याकडे रिक्षाने जाण्याइतकेही पैसे नव्हते. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष परमहंसदास महाराज हे स्वतःच्या रिक्षातून अन्सारी यांना घेऊन जात व फैजाबाद न्यायालयाच्या उपाहारगृहात खाऊ-पिऊ घालत. अशी सहिष्णुता व संयम फक्त हिंदूंमध्येच असू शकतो. गेल्या पंचवीस वर्षांत अन्सारी यांना महत्त्व आले व त्यांची याचिका महत्त्वाची ठरली. अयोध्या रामाचीच हे ते मानतात. मंदिर व्हावे असे सगळ्यांना वाटते, पण न्यायालयात त्याचा निर्णय होणार नाही. मंदिरासाठी अध्यादेश आणि कायदाच हवा. ते आजच शक्य आहे. अयोध्येत तेच वातावरण आहे. 2019 नंतर मंदिराच्या विषयावर मते मागणारे चोर आहेत अशी भूमिका घेऊन आता लोकांनीच उभे राहायला हवे. उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचले. आता राममंदिर होईल असे देशभरातील हिंदूंना वाटते. अयोध्येत तेच वातावरण आहे. कारण यामागचे व्होट बँकेचे राजकारण ‘ठाकरे’ अयोध्येत पोहोचल्याने संपले आहे.

Twitter- @rautsanjay61

Email- [email protected] 

आपली प्रतिक्रिया द्या