रोखठोक – इंग्रजांचे जंगलराज बरे होते!

3646

rokhthokविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आरेतील जंगलतोडीचा मुद्दा गाजला, पण आता थंड पडला. ब्रिटिशांचे राज्य ज्यांना जंगलराज वाटते त्या ब्रिटिशांनी या देशातील एका एका झाडाचे संगोपन कसे केले ते समजून घ्यायला हवे. झाडे बोलतात. झाडे रडतात. माणसांचे अश्रू खोटे असतात.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आरेच्या जंगलातील झाडे तोडण्याचा विषय गाजला, पण पर्यावरण हा आपल्या देशात निवडणुकांचा मुद्दा होऊ शकत नाही. सरदार सरोवरापासून ते आता मुंबईतील वृक्षतोडीपर्यंत याचा अनुभव आला आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड करू नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला, पण त्याआधीच ‘मेट्रो’ कॉर्पोरेशनने अडीच हजार झाडे रात्रीच्या अंधारात तोडून मैदान साफ केले. इलेक्ट्रिक करवतीने झाडे कापली. झाडे जमिनीवर कोसळताना झाडावरील पक्षी, त्यांची घरटी, घरटय़ांतील नवजात पिलेही मरण पावली. आरेच्या जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट, फडफडाट थांबला. झाडांना जीव असतो हे सत्ताधाऱयांना मान्य नसल्याने आपण 2500 जिवांचे बळी घेतले हे सत्य ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे पर्यावरण, निसर्ग, जलतत्त्व यावर सत्ताधाऱयांनी यापुढे बोलू नये हेच खरे.

save-aarey-students

झाडांची सत्ता

झाडांना मतांचा अधिकार नाही. तो असता तर खरचटलेल्या झाडांची सालपटे घेऊन राजकारणी रस्त्यावर रडताना दिसले असते. पक्षी, प्राणी मतदार नाहीत. त्यामुळे त्यांना पाकिस्तानचे नागरिक समजून ठार केले आहे. कवी द. मा. धामणस्कर यांची एक कविता या क्षणी आठवते-

।। झाडे सत्तेवर आली की…।।

माणसे निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात,

त्यांचे हातपाय तोडून त्यांना

बेमुर्वतखोरपणे

उघडय़ावर रचून ठेवतात

माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे

उद्या झाडे सत्तेवर आली की तीही

तोडलेल्या माणसांची हाडे अशीच उघडय़ावर रचून ठेवतील

वृक्षकुळातील कुणी मेला तर

माणसांचा सरपण म्हणून उपयोग करतील

फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी

खुनांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला

झाडेही आत्मसात करतील

फक्त एकदा

त्यांचे राज्य आले पाहिजे…

हे जंगल कसे?

हजारो शेतकऱयांच्या आत्महत्या, महापुरात वाहून गेलेले संसार हा जिथे राजकारण्यांच्या संवेदनांचा विषय होऊ शकत नाही तेथे झाडे हा विषय कसा होणार? झाडे सावली देतात. मात्र यापुढे लोक सावलीसाठी छत्र्या, टोप्या घालून फिरतील. झाडे प्राणवायू देतात. लोक यापुढे नाकाला प्राणवायूची नळकांडी लावून फिरतील. सर जगदीशचंद्र बोस या हिंदुस्थानी वैज्ञानिकाने हे सिद्ध केले आहे, वनस्पती, झाडे यांना जीव आहे. त्यांना स्पर्श, प्रकाश, संवेदना कळतात. वनस्पतीचा प्रतिसाद त्यांना मिळतो. उन्हात पाण्याशिवाय माणसे मरतात. झाडेही मरतात. झाडे जन्म घेतात व वाढतात. दगड वाढत नाही, पण अशा जिवंत झाडांची कत्तल निर्घृणपणे केली जाते. तामीळनाडू व कर्नाटकच्या जंगलात वीरप्पन व त्याची टोळी जंगलतोड करते, चंदनाच्या झाडांची तस्करी करते म्हणून शेवटी पोलिसांनी त्याला ठार केले. रस्त्यावरचे भटके कुत्रे जाणाऱया-येणाऱयांचे लचके तोडतात. त्यांनाही कायद्याचे संरक्षण आहे. पण जिवंत झाडांना ना कायद्याचे संरक्षण ना सरकारचे. हे चित्र भयंकर आहे. ही कत्तल संगनमताने झाली व हा मोठय़ा कटकारस्थानाचाच भाग आहे. आरे हे जंगल नाही हा सरकारचा दावा आहे, पण म्हणून झाडे तोडायची? मुंबईच्या रस्त्यांवर अनेक झाडे वाढली आहेत. त्या झाडांमुळे अपघात होतात, तरीही झाडे तोडायला न्यायालयाची परवानगी मिळत नाही. कायद्याच्या व्याख्येत व सरकारी कागदांवर ते जंगल दाखविलेले नाही म्हणून त्यास खतम करायचे? आरेमध्ये सध्या पाच लाख झाडे, दोन नद्या, तीन जलाशये, 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 76 प्रकारचे पक्षी, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश असे सर्वकाही आहे व सामान्य भाषेत आपण यालाच जंगल म्हणतो.

बोलणारी झाडे

ब्रिटिशांनी आपल्याला गुलामीत ठेवले, पण देशातील नद्या, झाडे, जंगले व निसर्गाच्या बाबतीत ते कमालीचे संवेदनशील होते. ते किती हळवे होते त्याची एक गोष्ट सांगतो व विषय संपवतो.

ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांना ‘मराठवाडा’ दैनिकात अग्रलेख लिहावा असे वाटले. असे एक बोलके झाड होते. त्या बोलक्या झाडाची ही गोष्ट.

।। बोलके झाड ।।

स्व. राजगोपालाचार्य हयात असतानाची गोष्ट आहे. ते गव्हर्नर जनरलच्या पदावरून निवृत्त होऊन मद्रासमध्येच राहात होते. एके दिवशी राजाजींनी मद्रासमधील एका झाडावर श्रद्धांजली वाहणारा मृत्युलेख लिहिला. झाले असे की, मद्रास शहरातील एका मोठय़ा हमरस्त्यावरील एक मोठे झाड उन्मळून पडले. प्रयत्न करूनही ते परत लावता आले नाही. ते झाड कायमचे अंतर्धान पावले. राजाजींना झाड उन्मळून पडल्याचे समजल्यावर ते त्याजागी गेले. ते झाड राजाजींच्या ओळखीचे होते. इंग्रजांचे राज्य असतानाही ते असेच उन्मळून पडले होते. तेव्हा मद्रासमध्ये एक इंग्रज गव्हर्नर होता. तो झाडांचा फार प्रेमी. त्याने येऊन उन्मळलेले झाड परत लावून घेतले. त्या झाडाचे जीवनचरित्र राजाजींनी रेखाटले. हे झाड म्हणे त्या गव्हर्नरांशी सकाळ-संध्याकाळ बोलत असे. त्याच्या स्वप्नात जात असे. स्वप्नात जाऊन ते आपली सुखदुःखे त्या इंग्रज गव्हर्नरपाशी सांगत असे. कोणी कुठे कुऱहाड मारली, वाहती जखम झाली, कोणी फांद्या तोडून सरपणासाठी नेल्या, मुळाला दुखापत झाली वगैरे गोष्टी हे झाड गव्हर्नरला रात्री स्वप्नात जाऊन सांगे. दुसरे दिवशी लाटसाहेब झाडापाशी येत आणि बघत तर स्वप्नात सांगितलेली गोष्ट खरी निघे. मग हा साहेब इलाज करी. झाडाला इजा पोहोचू नये म्हणून त्याने कुंपण तयार करून घेतले. पार बांधला. एकाच झाडाचे लाड कोणाच्या डोळय़ावर येऊ नयेत म्हणून ज्या ज्या व्यवस्था या झाडासाठी होत त्या त्या व्यवस्था त्या रस्त्यावरील इतर झाडांसाठीही करण्यात आल्या. हा गव्हर्नर पुढे एकटाच हिंदुस्थानात राहू लागला. बायको-मुले नव्हती. सकाळ-संध्याकाळ तो या झाडाखाली येऊन बसे व एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात त्याप्रमाणे या झाडाशी सुखसंवाद करीत बसे. लोक अर्थात या लाटसाहेबाला वेड लागले, तो झाडाशीच बोलतो असे म्हणत असत. पुढे तो इंग्लंडला गेला. त्याला समजले की ते झाड उन्मळले आहे. त्याने राजाजींना पत्र लिहून कळविले व त्याची व्यवस्था करा असे लिहिले. राजाजींनी योग्य ती व्यवस्था केली, परंतु शेवटी हे झाड मेले. तेव्हा गव्हर्नर हयात नव्हते. राजाजींनी त्या झाडाविषयी कारुण्यपूर्ण मृत्युलेख लिहून ते आणि त्याचा मित्र – तो गव्हर्नर, या दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबईत 2 हजार 500 झाडे मेली. त्यांच्या मरणावर शोक कमी आणि विकासाचा आनंदोत्सवच जास्त सुरू आहे.

ब्रिटिशांचे राज्य बरे होते असे कधी तरी म्हटले जाते ते यासाठीच.

2 हजार 500 झाडांना श्रद्धांजली. झाडे तुटली. राजकारण संपले. अश्रूही आटले.

Twitter – @rautsanjay61

Gmail – [email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या