भुकेल्याची भूक भागवणारी रोटी कपडा बँक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उदगीर

उदगीर शहरामध्ये व्यवसायिक व शिक्षीत तरुणांनी एकत्र येऊन निराधार व भुकेलेल्याची भुक भागवण्यासाठी रोटी व कपडा बँक चालू केली आहे.

शहरामध्ये विवाह सोहळा, शाळेमधील खिचडी, वाढदिवस, विविध कार्यक्रमामध्ये आलेल्या लोकांसाठी जेवणाची सोय असते. सर्वांचे जेवण झाल्यवर काही अन्न शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले अन्न फेकून न देता ते ज्यांना कोणाचाही आधार नाही व ज्यांना पोट भरण्यासाठी मागुन खावे लागते अशा लोकांना ते अन्न देऊन त्याची भुक भागवण्याचे काम या तरुणांनी चालू केले. राहुल शाह, सिदिकी असद, खुर्दिद अलम, शेख गौस, संतोष गर्जे, संतोष पवार यांनी हे काम सुरू केल्यावर सुरूवातीला आपल्या घरून अन्न आणून ते रेल्वे स्टेशन, सरकारी दावाखाना, निराधारगृह येथे वाटप केले जाई. हे काम करत असताना ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत त्याचा संपर्क करून कामाची माहिती देऊन अन्न घेऊन ते वाटप केले जाई. या तरुणांची धडपड व तळमळ बघून अनेक लोक या कामासोबत जुडले गेले आहेत.

सुरुवातीला स्वतःच्या पैशाने अ‍ॅटो द्वारे अन्न वितरीत केले जात असे आता ते व्हॅनने केले जाते. दररोज सरासरी ३०० लोकांना व ४० निराधार महिलांना अन्न दिले जाते. याच उपक्रमांतर्गत माणुसकीची भिंत चालू केली आहे. जळकोट रोडवरील भिंतीवर खिळे मारून वापरात नसलेले कपडे फेकून देण्याऐवजी त्या खिळ्याला कपडे अडकवले जात असून गरजू हे कपडे घेऊन जात आहेत. या भिंतीसाठी बाहेरगावी असलेल्या मित्रांकडून सुद्धा कपडे मागवले जातात. शहरामध्ये कार्यक्रमानंतर शिल्लक राहिलेल्या अन्नसाठी आता स्वतःहून नागरिक संपर्क करीत असल्याची माहिती राहुल शाह व खुदिर्द आलम यांनी दिली. समाजसेवा करत असताना सर्वसामान्यांच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्याचे काम रोटी कपडा बँकेच्या माध्यमातुन केले जात असून या कार्याचे कौतुक केले जात आहे.