आरपीएफने ‘फटका गँग’ ला दिला फटका, मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन । ठाणे

लोकलच्या दारात उभ्या प्रवाशांच्या हाताला फटका मारून त्यांचे मोबाईल, पर्स व इतर वस्तू चोरणाऱया टोळीच्या मुसक्या आरपीएफने दिवा स्थानकात आवळल्या. यावेळी एका मोबाईल चोराला रंगेहाथ पकडण्यात आरपीएफ जवानांना यश आले असून त्याचा दुसरा साथीदार पळून गेल्याने त्याचा शोध सुरू आहे. मात्र ‘फटका टोळी’चा बंदोबस्त करून त्यातील उर्वरित चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे मार्गावरील गस्तही वाढवण्यात आली आहे.

भिवंडी रेल्वे स्थानकावर डहाणू – पनवेल मेमू ट्रेन सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी आली. यावेळी फलाट क्रमांक दोनवरून पुढे पनवेल दिशेकडे मेमू जाताच मोबाईल चोर किसन पवार (19) याने दरवाजात उभ्या असलेल्या रवी तिवारी या प्रवाशाच्या हाताला जोरात फटका मारून मोबाईल खाली पाडला. हा मोबाईल घेऊन आरोपी किसन पळू लागला. त्यावेळी इतर प्रवाशांनी आरडाओरड करताच सतर्प झालेल्या आरपीएफ जवान गणेश नागमते यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. यावेळी किसनचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. नागमते यांनी आरोपी किसन याला दिवा पोलीस निरीक्षक विनोद मोरे यांच्या ताब्यात देऊन प्रवासी रवी यांचा मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला.