
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने स्पेशल कोम्बिंग पथक स्थापन केले असून त्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाकणार्या रोख पैसे, दारू आदी गोष्टींवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. सीएसएमटी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या स्थानकांवर ही टीम पाळत ठेवणार आहे.
मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने दोन टीमची स्थापना केली असून त्यात दिवसपाळी आणि रात्रपाळीच्या स्वतंत्र टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. दिवसपाळीच्या टीममध्ये पाच जणांचा समावेश असणार आहे. तर रात्रपाळीच्या टीममध्ये दहा जणांचा समावेश असणार असून त्यांच्या सोबत हॅण्ड मेटल डिटेक्टर व इतर साहित्य असणार आहे. तर रात्रपाळीच्या टीम सोबत कमांडोचे संरक्षण असणार आहे. निवडणुका जवळ आल्या की रोख रकमे सोबत दारूच्या बाटल्या आणि इतर मतदारांवर प्रभाव टाकणार्या वस्तूंची वाहतूक लोकलमधून करण्याची शक्यता गृहीत धरून या टीमची स्थापना करण्यात आली आहे. या दोन पथकांद्वारे कोणत्याही रेल्वे स्थानकावर अचानक धाड टाकून संशयित प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली जाणार आहे.
























































