
एका दारुडय़ास वाचविण्याचा प्रयत्न करताना भरधाव लोकलची धडक डोक्याला बसल्याने ऑन डय़ुटी आरपीएफ कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकाजवळ घडली. काही वर्षांपूर्वी प्रवाशाला मदत करण्यास जाताना पश्चिम रेल्वेच्या एका स्टेशनमास्तरचाही लोकलच्या धडकेत रात्रीचाच मृत्यू झाला होता. वांद्रे आणि माहीमदरम्यान फटका गँगला रोखण्याची डय़ुटी बजावत असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल रामवीरसिंह गुर्जर आपल्या तीन सहकाऱयांसह शुक्रवारी रात्री पेट्रोलिंगची डय़ुटी बजावत होते. त्यावेळी त्यांनी हार्बर डाऊन लाइनजवळ एका बाहेरील व्यक्तीला लघुशंका करताना पाहिले. त्यावेळी ते संशयाने त्याला हटकण्यासाठी रूळ ओलांडून स्टेबलिंग लाइनजवळ गेले असता त्यांना तो इसम दारूच्या नशेत झिंगलेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला भरधाव लोकलपासून वाचविण्यासाठी सुरक्षित स्थानावर खेचताना अप जलद मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱया विरार-चर्चगेट लोकलची धडक कॉन्स्टेबल रामवीरसिंह गुर्जर यांच्या डोक्याला बसून ते जागीच ट्रकशेजारी कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

























































