
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्या आरटीई 25 टक्के कोटा प्रवेशातील प्रतिक्षा यादीचा दुसरा टप्पा बुधवारी जाहीर झाला. प्रतिक्षा यादीतील 8 हजार 826 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून आतापर्यंत 239 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेश घेण्यासाठी 7 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना शाळेतील रिक्त जागांनुसार प्रवेशासंबंधी एसएमएस पाठविण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन अर्जाची स्थिती पहावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत.
मुंबई विभागात 627 विद्यार्थ्यांचे प्रवेश
मुंबई विभागातून प्रतिक्षा यादीतील 627 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यातील 491 विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या शाळेत तर 136 विद्यार्थ्यांना इतर बोर्डाच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबई विभागातून प्रतिक्षा यादीत एकूण 18226 विद्यार्थी होते. यातून प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांनी निवड झाली आहे.






















































