शाळांतील आरटीई प्रवेशाच्या पहिल्या सोडतीची प्रक्रिया आता पूर्ण झाल्यांनतर प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरू झाले. या यादीनुसार प्रवेश घेण्याची मुदत आज 26 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शिक्षण संचालनालयाने प्रवेश घेण्याची मुदत 29 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही मुदत अंतिम असून यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत.
राज्यात आरटीई प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झाली. यापैकी 60 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश कन्फर्म केले. तर प्रतीक्षा यादीसाठी 23 हजार 851 विद्यार्थी होते. यातील आतापर्यंत 10 हजार 97 विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले आहेत. प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून ही मुदत अंतिम असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.