
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ठोस पाऊल उचलले आहे. नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या स्कूल बसेस आणि व्हॅन्सवर आरटीओने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील 11 महिन्यांत मुंबई शहर व उपनगरांत 6,429 वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 1238 स्कूल बसेस व व्हॅन्सवर कारवाई करीत त्यांच्याकडून 59 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आरटीओने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. ते नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरटीओने स्कूल बसेस आणि व्हॅन्सची तपासणी मोहीम हाती घेऊन दंडवसुली सुरू केली आहे. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी व बोरिवली येथील आरटीओ कार्यालयांची वायुवेग पथके रस्त्यारस्त्यांवर गस्त घालत आहेत. या मोहिमे अंतर्गत एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या अवधीत 1238 स्कूल बसेस व व्हॅन्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ताडदेव आरटीओने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी 1647 वाहने तपासली. त्यापैकी दोषी आढळलेल्या 406 वाहनांकडून 17 लाखांचा दंड वसूल केला. अंधेरी आरटीओने नियम मोडणाऱ्या 350 वाहनांकडून 19 लाख 74 हजारांची दंडवसुली केली. वडाळा आरटीओने 405 वाहनांकडून 16 लाख 53 हजारांचा दंड आकारला. बोरिवली आरटीओने 77 दोषी वाहनांकडून 7 लाख 10 हजार 200 रुपये दंड वसूल केला. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओचे कर्मचारी सदैव सतर्क राहणार असल्याचे आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे होतेय नियम उल्लंघन
स्कूल बस वा व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे. नव्या नियमानुसार सीसीटीव्ही पॅमेरे, जीपीएस ट्रकिंग नसणे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी महिला मदतनीसांची अनुपस्थिती. वैध स्कूल बस परवान्याशिवाय शालेय विद्यार्थी वाहतूक.


























































