आरटीओचा नवीन ‘फेसलेस’ मंत्र…लर्नींग ड्रायव्हींग लायसन्ससाठी ‘आर्टीफिशिल इंटेलिजन्स’चे तंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळात निर्बंध असताना आरटीओमध्ये जाता येत नसल्याने नागरीकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना देण्यास सुरूवात केली, खरी परंतू हा ऑनलाईन शिकाऊ वाहन परवाना देताना दहावीच्या परीक्षेत जसे ‘डमी उमेदवार’ बसतात तसे प्रकार सुरू झाल्याने गडबड होऊ लागली. त्यामुळे परिवहन विभागाने आता आर्टीफिशिल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या ‘फेसलेस’ तंत्राचे उद्घाटन गुरूवार 2 जून रोजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे डमी उमेदवार बसविणे अशक्य होईल असे म्हटले जात आहे.

कोरोना लाटेत नागरीकांवर बंधने असल्याने त्यांना सोयीचे व्हावे म्हणून एप्रिल 2021 पासून शिकाऊ वाहन परवान्यासाठी घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केली. परंतू दलालांनी त्यावर कडी करीत स्वत:च चाचणी देऊन उमेदवारांना परीक्षेतून सुट दिली. त्यामुळे कोणालाही लायसन्स मिळू लागले. ‘शिकाऊ वाहन परवाना घर बसल्या मिळवा’ अशा दलालांच्या जाहिरातीही निघाल्याने चिंता वाढली. चाचणी न देता ‘लर्नींग ड्रायव्हींग लायसन्स’ अगदी व्हॉट्सअपवर मिळू लागल्याने राज्यभरातून परिवहन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

धोका वाढला होता…

शिकाऊ वाहन परवाना हा उमेदवाराला वाहन चालविणे शिकण्यासाठी मिळालेला असतो. तो केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. त्यानंतर ‘पक्के लायसन्स’ बनवावे लागते. शिकाऊ व्यक्ती गाडी चालवित असताना त्याच्या शेजारी पक्के ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती बसणे गरजेचे असते. असे कोणालाही शिकाऊ लायसन्स मिळाल्याने चुकीच्या हाती स्टिअरींग गेल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

सारथी सॉफ्टवेअरमध्ये केले बदल

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ‘सारथी’ सॉफ्टवेअरमध्ये फेसलेस तंत्रासाठी आवश्यक बदल केले आहेत. आर्टीफिशियल इंटेलिजन्सचे तंत्र जसे मोबाईलमध्ये किंवा बायोमेट्रीक मशीनमध्ये काम करते तसेच तंत्र चेहरा ओळखण्यासाठी वापरले जाईल. ही अत्याधुनिक यंत्रणा माणसाच्या चेहऱ्याची ठेवण ओळखेल आणि चाचणी पुढे सुरू राहील. जरी माणसाने केसांची स्टाईल बदलली, किंवा दाढी -मिशांमध्ये बदल केले तरी चेहर्‍याच्या मूळ ठेवणीचे 70 टक्के गुण मॅच करीत आर्टीफिशियल यंत्रणा असली उमेदवाराला ओळखत सिस्टीममध्ये प्रवेश करू देईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

डमीचा खेळ खल्लास….

संगणकाचा वेब कॅमेरा ऑन झाल्यावर उमेदवाराला हळूच बाजूला करीत दलाल लोकच स्वत: चाचणी द्यायचे. परंतू आता स्क्रिनवर जरा जरी हालचाल झाली तरी चाचणीची ऑनलाइन संगणकीय प्रक्रिया आपोआप बंद होईल. तसेच आधारकार्डवरील उमेदवाराच्या फोटोला ओळखूनच चाचणी सुरू होईल. त्यामुळे डमी उमेदवार चाचणीला बसण्याची शक्यता नष्ट होईल, त्यासाठी सारथी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल केले असून गुरूवार 2 जूनपासून ही प्रणाली लागू होईल असे सूत्रांनी स्पष्ट केले.