
ताकद, वेग आणि ऊर्जा या कौशल्यांचा खेळ अशी रग्बीची ओळख आहे. याच खेळाचा थरार आता हिंदुस्थानातील क्रीडाप्रेमींनाही अनुभवता येणार आहे. 1 जून 2025 ते 15 जून 2025 दरम्यान अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स, मुंबई येथे या व्यावसायिक लीगचे आयोजन केले जाणार आहे.
बंगळुरू ब्रेव्हहार्ट्स, चेन्नई बुल्स, दिल्ली रेड्झ, हैदराबाद हिरोज, कलिंगा ब्लॅक टायगर्स आणि मुंबई ड्रीमर्स हे सहा विजेतेपदासाठी भीडणार असून या लीगमध्ये अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, केनिया, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्पेन, फिजी, यूएसए आणि आयर्लंडसह रग्बी सेवन राष्ट्रातील 30 नामांकित खेळाडू सहभागी होतील. आरपीएलमध्ये 15 दिवसांत 34 सामने खेळवण्यात येतील आणि या लीगचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर केले जाईल.
अमेरिकन ऑलिंपिक पटू आणि प्लेअर ऑफ द इयर पेरी बेकर, लुकास लॅकॅम्प, दक्षिण आफ्रिकन ऑलिंपिकपटू रोस्को स्पेकमन, आयर्लंडचे ऑलिंपिकपटू व विश्वविजेते खेळाडू हॅरी मॅकनल्टी, जॉर्डन कॉनरॉय, टेरी केनेडी, पॅरिस ऑलिंपिक मध्ये केनियाचे प्रतिनिधित्व करणारा पॅट्रिक ओडोंगो, इंग्लंडचा ऑलिम्पिकपटू ॲलेक्स डेव्हिस, न्यूझीलंडचा ऑलिंपिकपटू व प्लेयर ऑफ द इयर चा मानकरी टोन एनजी शिउ, जागतिक मालिकेत न्यूझीलंडला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडू स्कॉट करी, अकुइला रोकोलिसोआ, रेगन वेअर, अमेरिकन ऑलिंपिक पटू आरोन कमिंग्ज, अर्जेंटिनाचे जागतिक सुवर्णपदक विजेते खेळाडू लुसियन गोंझालेझ, कास्यपदक विजेते सॅंटियागो मारे, जोआकिम पेलँडिनी, मॅटेओ ग्राझियानो, मथियास ओसाडझुक, स्पेनचे ऑलिंपिकपटू अलेजांद्रो लाफोर्गा, पॉल प्ला, मॅन्युएल मोरेनो, ओशनिया गेम्स चॅम्पियन्स 2021 विजेत्या फिजी संघातील खेळाडू जोसेवा तालाकोलो, 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पर्धेच्या विजेत्या फिजी संघातील खेळाडू आयोवाने तेबा, टेरियो वेलावाई , फिलिप सौतुरागा, जोजी नासोवा, वैसेया नाकुकु, ऑस्ट्रेलियन ऑलिंपिकपटू हेन्री हचिसन, मॉरिस लॉन्गबॉटम, जेम्स टर्नर इत्यादी नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, कॅनडा, हाँगकाँग आणि जर्मनीमधील 18 आंतरराष्ट्रीय खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतील. तसेच या लीगमध्ये 71 जणांच्या लिलाव गटातून निवडलेले 30 हिंदुस्थानी खेळाडू देखील सहभागी होतील.