
सामना प्रतिनिधी । बीड
जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांसाठी गर्भपिशव्या काढण्याच्या शस्त्रक्रियांच्या अनुषंगाने नियमावली घोषित करण्यात आली आहे. या नियमावलीचे सर्व खाजगी रुग्णालयांनी काटेकोरपणे पालन न केल्यास रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार पांडे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्भपिशवी काढण्याच्या नियम बाह्य शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आल्याने यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली घोषित केली आहे. तसेच महिला रुग्णांनी संभ्रमात शस्त्रक्रिया करण्यास होकार देऊ नये यासाठी त्यांचे प्रबोधन करणारे मुद्द्यांची माहिती प्रत्येक रुग्णालयाने दर्शनी भागात लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सदर शस्त्रक्रियां बाबत पारदर्शकता राखण्यासाठी बीड डिस्ट्रिक्ट नर्सिंग होम हा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करण्यात आला आहे.
रुग्णालयांसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक खाजगी रुग्णालयात होते की नाही यावर देखरेख ठेवले जाणार असून नियमित अहवाल, शस्त्रक्रिया पूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय अधिक्षक यांची पूर्व परवानगी घेण्याचे बंधन खाजगी रुग्णालयांवर घालण्यात आले आहे.
खाजगी रुग्णालयांनी महिला रुग्णांच्या गर्भ पिशवी शस्त्रक्रियांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांसह सदर रुग्णांना पूर्व तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या परवानगीसाठी संदर्भित करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच इमर्जन्सी तसेच ऑगस्ट ट्रिक केल्यानंतर 24 तासांच्या आत जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविण्यात यावे असे सूचित केले आहे.
संदर्भित झालेल्या रुग्णांच्या परवानगीची माहिती जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षक तत्काळ संबंधित खाजगी रुग्णालयांना कळवतील, प्रत्येक खाजगी रुग्णालयाने या शस्त्रक्रियांसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करून त्याच दिवशी या शस्त्रक्रिया होतील याची बंधन पाळावे व अशा निश्चित केलेल्या दिवसाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात कळवावी असे नियम घालण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत खाजगी रुग्णालयांनी अहवाल सादर करावयाचा आहे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
महिला रुग्णांसाठी मार्गदर्शक सूचना
- गर्भपिशवी काढण्याचा अगोदर लक्षात घ्या
- गर्भ पिशवी वरील प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते व त्यासाठी गर्भ पिशवी काढण्याची आवश्यकता नसते
- गर्भ पिशवी वर सूज आल्याने कॅन्सर होत नाही त्यासाठी औषधोपचार उपलब्ध आहेत
- लाल कपडा जाणे पांढरा कपडा जाणे यावर औषधोपचार उपलब्ध आहेत त्यासाठी प्रत्येक वेळी गर्भ पिशवी काढण्याची आवश्यकता नसते
गर्भ पिशवी काढण्याचे दुष्परिणाम
- हाडे ठिसूळ होणे
- मोठ्या प्रमाणात थकवा जाणवणे
- वजन वाढणे
- अकाली वार्धक्य जाणवणे
- नैराश्य येणे
- शारीरिक संबंधातील रस कमी होणे
महिलांनी गर्भपिशवी शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्याआधी या बाबींचा गांभीर्याने विचार करावा व नंतरच निर्णय घ्यावा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.



























































