
रुमेयसा गेल्गी ही जगातील सर्वात उंच महिला आहे. तिची उंची सात फूट सात इंच आहे. तिचा विमान प्रवास कसा असतो, हे दर्शवणारा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. गेल्गीला चक्क विमान प्रवास करताना स्ट्रेचरवर झोपावे लागते हे ऐकून धक्का बसला ना…तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये याची माहिती दिली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने रुमेयसा गेल्गीचा व्हिडीओ शेअर केला.
रुमेयसा गेल्गीचा तुर्की एअरलाइन्सच्या विमान प्रवासाचा हा व्हिडीओ आहे. टर्किश एअरलाइन्सने तिला यूएस आणि यूकेमध्ये प्रवासासाठी फ्लाइट उपलब्ध करून दिल्याबद्दल तिने आभार मानले. व्हिडीओमध्ये दिसते की, रुमेयसा गेल्गी विमानात चढताना स्ट्रेचरवर झोपलीय. एअरलाइन कर्मचारी तिला स्ट्रेचरसह उचलून विमानात घेऊन जात आहेत. मी अक्षरशः खूप उत्साहित आहे, माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहेत, असेही ती म्हणतेय.
मणक्याच्या त्रासामुळे मला वाकणे किंवा वळणे टाळावे लागते. माझ्या मणक्यामध्ये दोन लांब रॉड आणि 30 क्रू आहेत. म्हणूनच विमान प्रवासादरम्यान मला स्ट्रेचर वापरावे लागते. मी एक-दोन तासांपेक्षा जास्त काळ बसू शकत नाही. हा माझ्यासाठी सर्वात सुरक्षित आणि एकमेव पर्याय आहे, असे गेल्गी हिने सांगितले.
सात फुटांहून अधिक उंच असलेल्या रुमेयसा गेल्गीच्या नावे पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् आहेत. ती एक कार्यकर्ता, सार्वजनिक वक्ता आणि संशोधकदेखील आहे. ती वकील आहे. तिला गुन्हेगारी कादंबऱ्या वाचायला आवडतात. इतरांना प्रेरणा देण्यासाठी ती अनेकदा तिचे अनुभव शेअर करते.



























































