
शेअर बाजारातील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेण्याच्या सपाटय़ामुळे आज डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी गडगडला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही 65.55 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरून 85.63 वर बंद झाला. सोमवारी रुपयाचा भाव अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 15 पैशांनी वधारून 85.42 वर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण वाढल्याचाही रुपयाच्या घसरणीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी तब्बल 525.95 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. वाहन आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रीमुळे शेअर बाजारातही दोन दिवसांत तेजी दिसली नाही. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 872 अंकांनी कोसळून तो 81,186.84 वर स्थिरावला.