
रशियाने लोकप्रिय मेसेजिंग ॲप ‘टेलीग्राम’चे संस्थापक पावेल डुरोव यांच्याविरुद्ध दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. रशियाचे सरकारी वृत्तपत्र ‘रोस्सिस्काया गजेटा’ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सुरक्षा यंत्रणा ‘एफएसबी’ने (FSB) सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. डुरोव यांच्यावर रशियन दंडसंहितेच्या कलम 205.1 (दहशतवादी कारवायांमध्ये मदत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र डुरोव यांच्याकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, टेलीग्रामने रशियाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जगभरात 1 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते असलेल्या टेलीग्रामने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही आमच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत आहोत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. रशियन अधिकाऱ्यांच्यामते, हे प्लॅटफॉर्म ‘कट्टरपंथी मजकूर’ हटवण्यात अपयशी ठरले असून त्यावर यापूर्वीच काही निर्बंध लादण्यात आले आहेत.
पावेल डुरोव सध्या दुबईत राहत असून टेलीग्रामचे मुख्यालयही तिथेच आहे. रशियातील ही कारवाई टेलीग्रामवर दबाव वाढवण्यासाठी आणि रशियाने स्वतः विकसित केलेल्या ‘MAX’ या सरकारी मेसेजिंग ॲपकडे नागरिकांना वळवण्यासाठीची एक रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
































































