Russia Knife Attack- रशियातील युनिव्हर्सिटीत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला, विद्यार्थ्यांसह पोलिसही गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियातील बश्कोर्तोस्तानची राजधानी उफा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधील स्पोर्ट्स हॉलमध्ये शनिवारी एका माथेफिरूने केलेल्या चाकू हल्ल्यात चार हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एका अज्ञात हल्लेखोराने अचानक हॉस्टेलमध्ये घुसून तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांवर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर संपूर्ण परिसरात रक्ताचा सडा पडला होता आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपीने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्यावरही हल्ला केला, ज्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. किशोर (15) असे त्या हल्लेखोराचे नाव आहे. अथक प्रयत्नांनंतर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रशियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला असून तपास समितीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अद्याप या हल्ल्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाहीए. या घटनेची गंभीर दखल घेत रशियातील हिंदुस्थानी दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. जखमी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी आणि त्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी कजान येथील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासचे अधिकारी तातडीने उफवाकडे रवाना झाले आहेत.

या घटनेमुळे रशियात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक मीडियाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये लोक जखमींना रुग्णालयात नेताना दिसत आहेत. रशियन अधिकारी आता या हल्ल्याचा उद्देश काय होता आणि संशयित मुलाचा विद्यार्थ्यांशी काही संबंध होता का, याचा शोध घेत आहेत.