
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला आणि ‘घृणास्पद’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे यावर जोर दिला, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोमवारी सांगितले.
पुतिन यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम हत्याकांडातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा दर्शविला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
‘राष्ट्राध्यक्ष पुतिन @KremlinRussia_E यांनी पंतप्रधान @narendramodi यांना फोन करून हिंदुस्थानातील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा दर्शविला. त्यांनी या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा झालीच पाहिजे यावर जोर दिला’, असे जयस्वाल यांनी X वर दिलेल्या माहितीत म्हटले आहे.