
रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचे नाव बुरेव्हेस्टनिक असे आहे. याचा वेग 1300 किलोमीटर प्रति तास इतका आहे. जगातील कोणतीही यंत्रणा याला थांबवू शकत नाही, असा दावा रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी केला आहे. 21 ऑक्टोबर रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याची माहिती रशियन लष्करप्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी पुतीन यांना दिली. या चाचणीदरम्यान बुरेव्हेस्टनिकने सुमारे 15 तास उड्डाण केले आणि 14,000 किलोमीटर अंतर कापले. रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केलेल्या मिसाईलचे नाव बुरेव्हेस्टनिक (9एम730) असे आहे. हे पारंपरिक इंधनाऐवजी अणुभट्टीद्वारे चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. पुतीन यांनी याचे अजिंक्य शस्त्र असे वर्णन केले आहे. अमेरिकन हवाई दलाच्या अहवालानुसार, एकदा हे क्षेपणास्त्र सेवेत दाखल झाले की, रशियाकडे 10,000 ते 20,000 किमी अंतरखंडीय पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असेल. यामुळे रशिया अमेरिकेत कुठूनही हल्ले करू शकेल.


























































