
रशिया-युक्रेन युद्धामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना गोवलं जात असल्याची प्रकरणं गेल्या काही महिन्यांमध्ये उजेडात आली आहेत. अशातच आता पुन्हा एकदा उत्तराखंडमधील उधम सिंह नगरचा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता. परंतु त्याला बळजबरीने रशियन सैन्यात भरती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिन्याभरापासून त्याच्याशी कसलाही संपर्क होऊ न शकल्यामुळे राकेश कुमारच्या (30) कुटुंबाने हंबरडा फोडत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. तसेच मॉस्को स्थित हिंदुस्थानी दुतावासाकडे मदतीची मागणी केली आहे.
Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश कुमार हा 7 ऑगस्ट रोजी उच्च शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये त्याने प्रवेश घेतला होता. परंतु काहीच दिवसांनी परिस्थिती पूर्णपणे बदलून गेल्याची माहिती राकेशने कुटुंबीयांना दिली होती. 30 ऑगस्ट रोजी राकेशचा कुटुंबीयांशी थेट संपर्क झाला, तेव्हा त्याने रशियन सैन्यात बळजबरी भरती करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात लवकरच त्याला उतरवण्यात येईल, असंही तो म्हणाला. मात्र, त्यानंतर त्याच्याशी कुटुंबाचा संपर्क झाला नाही आणि काही दिवसांनी त्याचा लष्करी गणवेशातील फोटो त्यांना मिळाला. राकेशचा पासपोर्ट आणि सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्याचा इमेल आयडी सुद्धा डिलिट करण्यात आला आहे. युद्धभूमीवर जाण्यापूर्वी डोनबास प्रदेशात सैन्य प्रशिक्षण घेतल्याची माहिती राकेशने कुटुंबाला दिली. त्यानंतर कुटुंबाचा आणि त्याचा संपर्क होऊ शकलेला नाही. यामुळे तो जिवंत आहे की नाही? याची माहिती कुटुंबाला नाही.
या सर्व प्रकारामुळे कुटुंब हादरून गेले आहे. राकेशला परत मायदेशात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी 5 सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालायाला पत्र लिहून परिस्थितीची माहिती दिली आहे. तसेच स्थानिक नेत्यांशी सुद्धा संपर्क साधला आहे. पंजाब आणि हरयाणातील काही नागरिकांनी असा दावा केला आहे की, त्यांना शिक्षण किंवा नोकरीच्या बहाण्याने रशियाला जाण्यासाठी फसवले गेले आणि नंतर त्यांना रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडले.