रशियाचे लष्करी विमान क्रिमियात कोसळले; 29 जवानांचा मृत्यू, तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात विमान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच आता रशियन लष्कराच्या विमानाला भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. रशियन लष्कराचे ‘अँटोनोव्ह एएन-26’ (Antonov An-26) हे मालवाहू वाहतूक विमान क्रिमियामध्ये एका खडकावर कोसळले. या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व 29 जणांचा मृत्यू झाला असून रशियन संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान मंगळवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार 6 च्या सुमारास रडारवरून गायब झाले होते. त्यानंतर विमानाशी असलेला संपर्क तुटला आणि काही वेळातच ते एका खडकाळ भागात कोसळल्याचे समोर आले. सुरुवातीला युक्रेनकडून या विमानावर हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र प्राथमिक तपासात विमानावर बाहेरील कोणत्याही आघाताच्या खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे हे विमान युक्रेनने पाडलेले नसून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज रशियन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून प्रवासी आणि लष्करी अशा दोन्ही प्रकारच्या विमान अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. क्रिमियातील या ताज्या अपघातामुळे रशियन लष्कराचे मोठे नुकसान झाले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आला आहे.