हिंदुस्थानी नौदलाची ‘पॉवर’ वाढणार, रशियातून तमल युद्धनौका येतेय!

कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग पसरले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी नौदल सज्ज असताना आता हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात लवकरच तमल युद्धनौका दाखल होणार आहे. रशियामध्ये बनवण्यात आलेली ही आधुनिक स्टेल्थ युद्धनौका मे महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 28 मे 2025 रोजी हिंदुस्थानी नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. या युद्धनौकेला जूनच्या पहिल्या आठवडय़ात अधिपृतपणे ताफ्यात समाविष्ट केले जाईल. ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्रने सुसज्ज आहे. ही युद्धनौका रडारवरही पकडली जात नाही, ही या युद्धनौकेचे खास वैशिष्टय़े आहे. तमल युद्धनौका 2016 च्या भारत-रशिया संरक्षण कराराचा एक भाग आहे. ज्याअंतर्गत चार तलवार-श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेट्स बांधले जात आहेत. यापैकी दोन रशियातील शिपयार्ड येथे आणि दोन भारतातील गोवा शिपयार्ड येथे बांधले जात आहेत. तमल हे रशियामध्ये बांधलेले दुसरे फ्रिगेट आहे.

 ही युद्धनौका एकाच वेळी 3 हजार किलोमीटरचे अंतर कापते. या युद्धनौकेचे वजन 3900 टन इतके आहे. ही युद्धनौका 55 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागू शकते. या युद्धनौकेच्या ऑपरेशन्स आणि तांत्रिक प्रणालींबद्दल 200 हून अधिक भारतीय नौदल कर्मचाऱयांना रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 हिंदुस्थान-रशिया या दोन देशात झालेल्या करारांतर्गत गोवा शिपयार्डमध्ये तलवार-श्रेणीतील आणखी दोन स्टेल्थ फ्रिगेट्स बांधले जात आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असलेली इंजिने आधीच ऑर्डर करण्यात आली आहेत. तसेच याआधी रशियापासून 12,500 नॉटिकल मैलांचे अंतर कापून आयएनएस तुशील डिसेंबरमध्ये भारतात पोहोचली. ती आठ देशांमधून गेली. ती 9 डिसेंबर रोजी कार्यान्वित झाली. आता ‘तमल’ त्याची जागा घेईल, जे अधिक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.