विशेष – चिंतनाचे महामेरू!

>> समीर गायकवाड

अभिजात साहित्यिक हा लौकिक मिळवणारे ज्येष्ठ साहित्यकार एस. एल. भैरप्पा यांचे नुकतेच निधन झाले. प्रतिभेची अमूल्य देणगी लाभलेल्या भैरप्पा यांचे लेखन म्हणजे अविरत सुरू असलेला एक संवाद होता, जो इतिहासाशी, मनाशी आणि समाजाशी निगडित होता, जो त्यांच्या निधनानंतरही अक्षररूपाने प्रतिध्वनित होत राहील.

लेखकाने रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, पात्रांचे संवाद आणि कथा, कादंबरीमागची पार्श्वभूमी यांचा त्याच्या वैयक्तिक जीवनाशी, त्याच्या संघर्षाशी संबंध असतो का? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न येत नाही. कारण संवेदनशील लेखक आपला संघर्ष आणि आपली जडणघडण यांच्याशी प्रतारणा करून लिहू शकत नाही. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा मोठा पडसाद त्याच्या लेखनातून उमटत राहतो. वयाच्या विविध कालखंडात हा परिणाम भिन्न रूप धारण करतो आणि त्यायोगे लेखकाच्या आयुष्यातील एकंदर घडामोड समोर येते. वाचकांना स्तब्ध करण्याची ताकद यात असते. एस. एल. भैरप्पा यांचे लेखन कित्येक दशके भारतीय समाजमनावर गारुड घालण्यात यशस्वी ठरलेय याची पार्श्वभूमी हीदेखील असू शकते. त्यांच्या शब्दांनी इतिहासाच्या पडद्याआड दडलेले सत्य उघड केले, मानवी मनाच्या गहन गर्ता खणल्या आणि सामाजिक संरचनांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यात ते सफल झाले. भैरप्पा हे एका उन्नत व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. त्यांचे वैयक्तिक जीवन आणि साहित्य यांच्यातला बंध इतका घट्ट गुंफलेला होता की, त्यांना वाचताना, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वेदनेचा, संघर्षाचा आणि विजयाचा साक्षीदार असल्याचा भास वाचकाला व्हावा!

1931 मध्ये हासन जिल्ह्यातील संतेशिवर गावात त्यांचा जन्म झाला. होयसळ कर्नाटकी ब्राह्मण कुटुंबातील एका साध्या घरातून त्यांचा प्रवास सुरू झाला. बालपणीच्या दुःखद घटनांनी त्यांच्या  अनेक जाणिवांना आकार दिला. नऊ वर्षांच्या वयात प्लेगने त्यांच्या आई आणि भावंडांना गिळंकृत केले. त्यामुळे भैरप्पा यांना लहानपणातच कुटुंबाच्या जबाबदाऱया खांद्यावर घेण्याची वेळ आली. हे दुःख इतके खोलवर रुजले की, त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “माझ्या लहान भावाचा मृतदेह मी स्वत उचलून अंत्यसंस्कारासाठी नेला आणि त्याक्षणीच मला उमजले की, जीवन म्हणजे एका भिंतीवर उभं राहून सत्य शोधणे.” हा प्रसंग त्यांच्या वैयक्तिक वेदनेपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या साहित्यातील सामाजिक आणि मानसिक संघर्षांच्या बीजाचा तो मूल घटक  ठरला. भैरप्पा यांचे बालपण हे दारिद्रय़ आणि अनिश्चिततेच्या छायेत गेले. आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या उदासीनतेमुळे त्यांना चुलतभावाच्या सल्ल्याने हायस्कूल सोडून मुंबईकडे वळावे लागले. तेथे रेल्वेत कामास असताना काही साधू मंडळींसोबत प्रवास करताना त्यांनी जीवनाच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हे भटकंतीचे वर्ष त्यांच्या आत्मचरित्रात नोंदलं आहे, ज्यात ते लिहितात, “मी मुंबईच्या गर्दीत हरवलेलो नव्हतो. मी स्वतला शोधत होतो आणि त्या शोधात मला साहित्याची ओढ लागली.”

हा कालावधी केवळ भटकंतीचा नव्हता. तो भैरप्पा यांच्या साहित्यातील ग्रामीण-शहरी द्वंद्वाचा, आध्यात्मिक शोधाचा प्रारंभ होता. परतल्यावर मैसूर विद्यापीठातून बीए आणि एमए तत्त्वज्ञानात गोल्ड मेडल मिळवत ते पुढे सरकले. त्यानंतर त्यांनी ‘सत्य मत्तु सौंदर्य’ या विषयावर डॉक्टरेट केली, जी त्यांच्या साहित्यातील सौंदर्यशास्त्राच्या गहन अभ्यासाची पायाभरणी ठरली. हे शैक्षणिक यश केवळ पदवीपुरते सीमित नव्हते. बालविधवेसारख्या संघर्षमय जीवनातून उमटलेली विजयाची ती अधीर कथा होती, त्यायोगे भैरप्पा यांना शिकागो विद्यापीठातून आमंत्रण मिळाले आणि त्यांच्या विचारांना जागतिक व्यासपीठ लाभले.

1996 साली प्रकाशित झालेले भैरप्पा यांचे कन्नड भाषेतील आत्मचरित्र ‘भित्ती’ हा केवळ स्मृतींचा आलेख नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला एक भित्तिचित्र म्हणून चितारलेय. या पुस्तकात बालपणातील प्लेगच्या महामारीचे वर्णन हृदय पिळवटून टाकते. आई-भावंडांच्या मृत्यूने त्यांचे जग कोलमडले. त्यांचे आत्मचरित्र कन्नड साहित्यातील  मैलाचा दगड मानले गेलेय. मैसूर विद्यापीठातील अभ्यास काळात गोरूर रामस्वामी अय्यंगारांच्या लेखनाने प्रेरित होऊन ते साहित्याकडे वळले. ‘भित्ती’मध्ये ते साहित्यिक वादविवादांचे उल्लेख करतात, जसे की यू.आर. आनंदमूर्ती यांच्याशी झालेल्या तीव्र चर्चा, ज्या त्यांच्या विचारसरणीच्या संघर्षाचे प्रतीक ठरल्या. हे पुस्तक हिंदी, मराठी आणि इंग्रजीत अनुवादित  झाले. त्यातून भैरप्पा यांचे जीवन हे एक अखंड शोधयात्रेसारखे भासते. शोध जो प्लेगच्या राखेतून उमटला आणि साहित्याच्या शिखरापर्यंत पोहोचला. ‘वंशवृक्ष’पासून ‘पर्व’पर्यंत भैरप्पा यांचा साहित्यिक प्रवास 1958 मध्ये ‘भीमकाया’ या पहिल्या कादंबरीने सुरू झाला, जी एका कुस्तीपटूच्या जीवनावर आधारित आहे. त्यात त्यांच्या ग्रामीण अनुभवांचा ठसा उमटला, पण खरा टर्निंग पॉइंट ‘वंशवृक्ष’च होता, ज्यात कौटुंबिक वारसा, सामाजिक अपेक्षा आणि भिन्न स्वभावांच्या व्यक्तिचित्रांच्या परस्पर संघर्षाचे चित्रण आहे. या कादंबरीला कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि त्यावर चित्रपटही निघाला. भैरप्पा यांच्या शैलीच्या गाभ्यात तात्त्विक चिंतन करत वाचकांच्या मनात खोलवर पाझरणारे कथानक आढळते. यात संशोधनाची खोली असतेच. वर्षानुवर्षे अभ्यास करून लेखन केले असल्याने कदाचित तो प्रभाव जाणवत असावा. परिणामी त्यातील पात्रे काल्पनिक न वाटता प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब ठरतात. 1970 मधील त्यांची ‘गृहभंग’ ही कादंबरी राष्ट्रीय पुस्तक ट्रस्टने चौदा भारतीय भाषांत अनुवादित केला, जी भारतीय साहित्यातील क्लासिक रचना मानली जाते. त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या ‘दातू’ या कादंबरीने केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार मिळवला, ज्यात सामाजिक संक्रमण आणि नैतिक द्वंद्वाचे चित्रण आहे. या कादंबऱया भैरप्पा यांच्या शैलीचे वैशिष्टय़ दाखवतात, ज्यात केवळ कथावस्तू नसून मानवी भावनांच्या जाळ्यात गुंतलेला लॉजिक्सचा वेध आहे.

भैरप्पा यांच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट कृती म्हणजे 1979 सालची ‘पर्व’ ही कादंबरी होय. यात महाभारताचे समाजशास्त्राrय आणि मानववंशशास्त्राrय दृष्टिकोनातून पुनर्रचन आहे. या कादंबरीत महाभारतातील मुख्य पात्रे – कर्ण, द्रौपदी, भीष्म – स्वतच्या दृष्टिकोनातून कथा सांगतात, ज्यात युद्धाच्या मागील सामाजिक संरचना, नैतिकता आणि शक्तीच्या गतिशीलतेचे विश्लेषण आहे. कथानक हे मेटाफॉरिकल आहे, ज्यात कौरव-पाडवांच्या द्वंद्वापलीकडे जाऊन मानवी संबंधांचे सूक्ष्म निरीक्षण केले आहे. ‘पर्व’ ही भैरप्पा यांच्या संशोधनाची पराकाष्ठा आहे. त्यांनी महाभारताच्या हजारो श्लोकांचा अभ्यास करूनच ही कथा रचली, ज्यामुळे ती केवळ कन्नड नव्हे, तर भारतीय साहित्यातील मैलाचा दगड ठरली. नाटय़रूपातही रूपांतरित झालेली ही कादंबरी वादग्रस्त ठरली. कारण तिने महाभारताला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता सामाजिक दस्तऐवज म्हणून पाहिले. त्यांच्या इतर महत्त्वाच्या कादंबऱयांमध्ये ‘सरसम्माणा समाधी’चा उल्लेख करावा लागेल, ज्यात एका स्त्राrच्या आध्यात्मिक शोधाची कथा आहे, जी सामाजिक बंधनांमधून मुक्त होण्याच्या प्रयत्नात गुंतते. ‘नायी नेरळू’मध्ये मानसिक विकृती आणि सामाजिक भेदभावाचे  चित्रण आहे. 2007 साली प्रकाशित झालेली ‘आवरण’ ही त्यांची कादंबरी अत्यंत वादग्रस्त ठरली. त्यात एका स्त्राrचा इतिहासाच्या अभ्यासाचा प्रवास दाखवला आहे, जो इस्लामी राजवटीच्या काळातील सांस्कृतिक विनाश आणि धार्मिक कट्टरतेच्या प्रश्नांना उघड करतो. टिपू सुलतानच्या काळातील घटनांचा आधार घेऊन रचलेल्या या कथानकाने यू.आर. आनंदमूर्तीसारख्या समीक्षकांना ‘धोकादायक’ म्हटले, पण भैरप्पा यांनी हा ‘सत्याचा शोध’ असल्याचे सांगितले. 2017 साली प्रकाशित झालेली ‘उत्तरकांड‘ ही कादंबरी रामायणाची सीतेच्या स्त्राr दृष्टिकोनातली पुनर्रचना आहे, ज्यात वनवास आणि अग्निपरीक्षेच्या घटनांना वास्तववादी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या कादंबऱया भैरप्पा यांच्या साहित्यिक वैशिष्टय़ दाखवतात.

भैरप्पा यांचे साहित्य हे ऐतिहासिक शोधाचा एक भाग आहे, ज्यात ते प्राचीन ग्रंथांचा, पुरातन दस्तऐवजांचा आधार घेऊन वर्तमानाच्या सामाजिक संरचनांना आव्हान देतात. ‘पर्व’ आणि ‘उत्तरकांड‘सारख्या कादंबऱयांमध्ये महाभारत आणि रामायण या केवळ पौराणिक कथा नसून सामाजिक मूल्ये आणि नैतिकतेचे दर्पण ठरतात. त्यांच्या लेखनात इतिहासाला मानसशास्त्राrय दृष्टिकोनातून पाहिले जाते.

भैरप्पा यांचा हा शोध केवळ बौद्धिक नव्हता. तो धार्मिक प्रश्नांना सामाजिक आकलनाशी जोडतो. जसे की, ‘धर्मश्री’मध्ये ख्रिश्चन धर्मांतरण आणि सांस्कृतिक वेगळेपणाचे चित्रण आहे, ज्यात व्यक्तीच्या अंतर्मनातील द्वंद्व इतिहासाच्या व्यापक संदर्भात उलगडते. त्यांच्या साहित्यात धार्मिक कट्टरता ही केवळ शत्रू नाही. ती मानवी कमकुवतपणाची अभिव्यक्ती आहे, जी सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत रुजलेली असते. स्वतच्या साहित्याची चिकित्सा करताना ते म्हणतात की, लेखकाचे काम हे केवळ कथा सांगणे नसून समाजाला त्याच्या मुळांपर्यंत नेता आले पाहिजे!