प्रासंगिक – बायबलमधील चित्रमय प्रतिमासृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज वाचकांना नाताळच्या शुभेच्छा देताना बायबलचे एक आगळे वैशिष्टय़ पाहूया. ते म्हणजे या ग्रंथाची प्रासादिक लेखनशैली.

बायबल जरी अध्यात्मिक ग्रंथ असला तरी त्याची प्रतिमासृष्टी समजायला सुलभ आणि सुंदर आहे. सगळे इतक्या सरळ भाषेत मांडले आहे की, आपले संतसाहित्य वाचल्यासारखा अनुभव येतो.

जीवनाची क्षणभंगुरता मांडताना वापरलेल्या प्रतिमा पाहा. सर्व लोक गवतासारखे आहेत आणि त्यांचे वैभव गवतातील रानफुलासारखे आहे. गवत सुकते, फूल गळून पडते. एकूण 150 स्तोत्रांतील स्तोत्र क्र. 23 म्हणते, ‘परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो मला हिरव्या कुरणात संथ पाण्याजवळ नेतो. मी भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसलेही भय वाटणार नाही, कारण परमेश्वर माझ्याबरोबर आहे.’

‘नीतीसूत्रा’त शिस्तीचे महत्त्व सांगताना राजा शलमोन म्हणतो, अरे आळश्या, किती वेळ निजशील? थोडीशी झोप घेतो, आणखी थोडी डुलकी घेतो, आणखी हात उराशी धरून निजतो असे म्हणत जाशील तर दारिद्रय़ तुला ‘दरोडेखोराप्रमाणे’, आणि गरिबी ‘सशस्त्र मनुष्या’प्रमाणे गाठील. प्रामाणिक कष्टाचे महत्त्व सांगताना राजा म्हणतो, अरे आळश्या, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी किंवा तिच्यावर देखरेख करणारा नाही. तरीही उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते.

‘उपदेशक’ या भागाचा लेखक राज शलमोन जीवनाची व्यर्थता सांगताना म्हणतो, सारे काही व्यर्थ आहे. जे वाकडे आहे ते सरळ होत नाही, जे उणे आहे ते जमेस धरता येत नाही.

खुद्द येशूची भाषाशैलीसुद्धा चित्रमय आहे. ऐहिकात जास्त गुंतून न पडण्याचे आवाहन करताना येशू ख्रिस्त म्हणतात, काय खावे आणि काय प्यावे अशी जिवाविषयी किंवा काय पांघरावे अशी शरीराविषयी चिंता करू नका. कारण जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रापेक्षा महत्त्वाचे आहे. आकाशातील पाखरांकडे पाहा ती पेरणी करीत नाहीत किंवा कापणी करीत नाहीत. तरीही परमेश्वर त्यांना रोज खावयास देतो. देवासाठी तुम्ही त्या पाखरांपेक्षा अधिक मौल्यवान नाहीत का?

येशू ख्रिस्त एका फकिराचे जीवन जगले. एकदा त्याच्या प्रवचनांनी प्रभावित होऊन एका शास्त्र्याने त्याच्याबरोबर येण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा येशू म्हणतात, कोह्यांना राहायला बिळे आहेत आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवायला धोंडाही नाही.

इतरांचे दोष काढू नयेत हे सांगताना प्रभू कसे चित्रमय प्रतीक वापरतो पाहा. तो म्हणतो, तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का काढू पाहतोस? आधी आपल्या डोळ्यातले मुसळ काढ म्हणजे भावाच्या डोळ्यातले कुसळ तुला चांगले दिसेल. ढोंगी धर्ममार्तंडाचे वर्णन करताना तो म्हणतो, ते रंग लावलेल्या थडग्यांप्रमाणे आहेत. बाहेरून स्वच्छ दिसतात, पण आतून सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत.

बायबलमधील एका प्रेषिताने येशू ख्रिस्तांच्या विचारांनी जगात जो बदल होईल त्याचे कसे चित्रमय वर्णन केले ते पाहा- लांडगे मेंढरांबरोबर शांतीने राहतील, सिंह आणि बैल एकत्र राहतील, लहान मुलगाही त्यांना वळील. कुणीही कुणाला इजा करणार नाही, सापही माणसाला दंश करणार नाहीत. तान्हे मूलसुद्धा नागाच्या वारुळाजवळ खेळेल, ते त्याच्या बिळात हात घालेल.

अशा सोप्या भाषाशैलीमुळे बायबल वाचायला सोपे झाले आहे. मानवजातीसाठी शांततामय जगाचे स्वप्न पाहणाऱ्या, विश्वकल्याणासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘आपल्या शत्रूवरही प्रेम करा’ अशी शिकवण देणाऱ्या त्या येशू ख्रिस्तांचा  जन्म आज प्रत्येक धार्मिक हृदयात होवो हीच प्रार्थना!

  • श्रीनिवास बेलसरे