सामना अग्रलेख – कथा आणि व्यथा; महाडमधील इमारत दुर्घटना

महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या नावात ‘पॅलेस’ असूनही ही इमारत चार-पाच वर्षांतच रहिवाशांसाठी ‘दफनभूमी’ बनली. जीर्ण-शीर्ण इमारतींबरोबरच नव्या इमारतीही कोसळू लागल्या तर कसे व्हायचे? इमारत कोसळली की तिच्या सदोष बांधकामापासून स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट वगैरेपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित होतात. इमारत दुर्घटना मुंबईतील असो, पुणे-नागपुरातील असो किंवा महाडमधील, प्रत्येक दुर्घटनेची, त्यात जीव गमावणाऱ्या आणि सर्वस्व उद्ध्वस्त होणाऱ्या रहिवाशांची ‘कथा’ आणि ‘व्यथा’ तीच असते. महाडच्या इमारत दुर्घटनेनंतर तरी हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे.

पावसाळा आणि इमारत दुर्घटना हे अलीकडील काही वर्षांत दुर्दैवी समीकरणच झाले आहे. मुंबईसारख्या महानगरात जुन्या आणि धोकादायक इमारती दुर्घटनाग्रस्त होत असतात, परंतु महाडमध्ये सोमवारी कोसळलेली इमारत ना जुनी होती ना धोकादायक. जेमतेम पाच-सहा वर्षांपूर्वीची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कशी कोसळू शकते? आता संबंधित बिल्डरसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला हे चांगलेच झाले. संबंधितांना भविष्यात शिक्षा वगैरे होईल, चौकशीतून दुर्घटनेची कारणे समोर येतील हे सगळे ठीक आहे; पण गेलेले जीव आणि उद्ध्वस्त कुटुंबे यांचे संसार कसे सावरले जाणार, हा प्रश्न आहेच. ‘तारिक पॅलेस’ या दुर्घटनाग्रस्त इमारतीत एकूण 45 फ्लॅटस् होते. त्यापैकी काही रिकामे होते, पण ‘ए’ आणि ‘बी’ विंगमध्ये काही कुटुंबे राहत होती. त्यातील बरेच लोक सुदैवाने वेळीच इमारतीतून बाहेर पडले. तथापि, 18 ते 20 जण तेवढे सुदैवी नव्हते. ते ढिगाऱयाखाली अडकल्याचा अंदाज आहे. या इमारतीबाबत ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांचा विचार करता ही दुर्घटना टाळता आली असती असे म्हणण्यास वाव आहे. इमारतीच्या काही पिलर्सना तडे गेले होते किंवा काही महिन्यांपासून इमारत हलत होती अशा तक्रारी तेथील रहिवाशांनी आधीच बिल्डरकडे केल्या होत्या असे सांगण्यात येत आहे. असे जर असेल तर संबंधित बिल्डरने या रहिवाशांना दुर्घटनेच्या गुहेत ढकलले असेच म्हणावे लागेल. अर्थात या प्रकारची

जीवघेणी बेफिकिरी

इतर दुर्घटनांमध्येही दिसून आली आहेच. मग त्या इमारत कोसळण्याच्या घटना असोत, आगीच्या दुर्घटना असोत नाहीतर इतर प्रकारच्या. मुंबईसारख्या महानगरात अनेक कुटुंबे पर्याय नसल्याने किंवा मुंबई सोडून इतरत्र जाण्याची तयारी नसल्याने जुन्या, धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. प्रशासनाने इशारे, नोटिसा बजावूनही उपयोग होत नाही. अर्थात यात या सामान्य रहिवाशांनाही दोषी म्हणता येणार नाही. ते जाणार कुठे? संक्रमण शिबिरांची सोय असली तरी तेथे विस्थापितांसारखे किती वर्षे राहावे लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा कोंडीत सापडलेले रहिवासी राहत्या धोकादायक इमारतीचाच पर्याय निवडतात. महाडमधील ‘तारिक पॅलेस’ इमारतीचे तसे नव्हते. तरीही तिच्या पिलर्सना तडे कसे गेले? तक्रारी करूनही बिल्डरने दुरुस्ती का केली नाही? इमारतीचे मूळ बांधकामच सदोष होते का? तसे असेल तर संबंधित यंत्रणा काय करीत होत्या? सदोष बांधकाम असूनही रहिवासाचा दाखला कसा देण्यात आला? असे अनेक प्रश्न या दुर्घटनेने उपस्थित केले आहेत. हेच प्रश्न प्रत्येक दुर्घटनेनंतर उपस्थित होत असतात. तरीही दुर्घटना घडतातच. एकट्या मुंबईमध्ये मागील सात वर्षांत तब्बल 3 हजार 944 छोटय़ा-मोठय़ा इमारत दुर्घटना झाल्या. त्यात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला. मालक-रहिवासी वाद, विकासकाकडून होणारी फसवणूक, प्रशासनाकडून होणारी बेपर्वाई आणी इमारती धोकादायक होऊनही त्या न सोडण्याची रहिवाशांची मानसिकता

अशी अनेक कारणे

मुंबईतील इमारत दुर्घटनांसाठी निमित्त ठरली आहेत. गेल्याच महिन्यात मुंबईच्या फोर्ट परिसरातील ‘भानुशाली’ या 80 वर्षे जुन्या पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून काहीजण मृत्युमुखी पडले होते. ही इमारत उपकरप्राप्त होती. ती दुरुस्त करण्याची परवानगीही दिली गेली होती, पण लॉक डाऊनमुळे रखडलेली दुरुस्ती दुर्दैवी लोकांच्या जिवावर बेतली. गेल्या महिन्यातच मालाड परिसरातही दुमजली चाळ कोसळून दोघांना जीव गमवावा लागला होता. आता महाडमधील इमारत दुर्घटनेत काही निरपराध्यांचा बळी गेला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा सर्वच मोठ्या शहरांमध्ये इमारत दुर्घटनांचा प्रश्न गंभीर आहे. महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या नावात ‘पॅलेस’ असूनही ही इमारत चार-पाच वर्षांतच रहिवाशांसाठी ‘दफनभूमी’ बनली. जीर्ण-शीर्ण इमारतींबरोबरच नव्या इमारतीही कोसळू लागल्या तर कसे व्हायचे? इमारत कोसळली की तिच्या सदोष बांधकामापासून स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट वगैरेपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित होतात. इमारत धोकादायक, जुनी असेल तर ‘ना हरकत प्रमाणपत्रा’पासून नोटिसा बजावून हात झटकण्याच्या प्रशासनाच्या प्रवृत्तीपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा होते. आता महाडमधील इमारत नवीन असूनही पुन्हा त्याच नेहमीच्या प्रशासन आणि बिल्डरच्या जीवघेण्या बेफिकिरीवर चर्चा सुरू झाली आहे. इमारत दुर्घटना मुंबईतील असो, पुणे-नागपुरातील असो किंवा महाडमधील, प्रत्येक दुर्घटनेची, त्यात जीव गमावणाऱ्या आणि सर्वस्व उद्ध्वस्त होणाऱ्या रहिवाशांची ‘कथा’ आणि ‘व्यथा’ तीच असते. महाडच्या इमारत दुर्घटनेनंतर तरी हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या