
मखमली आवाजाची मलमली गायिका हीच आशा भोसले यांची ओळख होती. अष्टपैलू व सदाबहार गायिकेची ही स्वरगंगा आज पंचत्वात लुप्त होत असली तरी चंद्र, सूर्य, तारे असेतोवर ‘आशा भोसले’ हे नाव व त्यांचे सूर अजरामर राहतील. पृथ्वीलोकाचे हृदय जिंकणारा आवाज आज स्वर्गलोकी निघाला आहे. साक्षात सरस्वती असलेल्या गानसम्राज्ञी लतादीदी तेथील दारी धाकटय़ा बहिणीच्या स्वागतासाठी औक्षणाचे ताट घेऊन उभ्या असतीलच!
नऊ दशकांपूर्वी पृथ्वीलोकास दिलेल्या मखमली आवाजाचे दैवी वरदान आज देवलोकानेच हिरावून घेतले. आशा भोसले हे या वरदानाचे नाव. आशा भोसले गेल्या असे म्हणायचे तरी कसे? हजारो अवीट गाणी गाणाऱ्या आशाताई तर रसिकांच्या हृदयावर सदैव राज्य करतील, मग हृदयविकाराच्या एका झटक्याने त्या कशा जातील? ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्यानंतर तिथे राहिला तो केवळ त्यांचा निश्चेष्ट देह, पण गेली ऐंशी वर्षे आपल्या गोड गळ्यातून आशा भोसलेंनी जे सप्तसुरांचे श्वास घेतले ते तर इथेच असणार आहेत! जगभरातील रसिकांच्या कानांवर आणि मनांवरही अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसलेंचा गळा आणि त्यांचा चिरतरुण सूर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर समस्त सृष्टीचे भूषण होते. आशाताईंचा सूर जसा सदैव ताजातवाना तसेच त्यांचे मनही कायम तरुणच राहिले. त्यामुळे आशा भोसलेंनी वयाची 92 वर्षे पूर्ण केली तरी त्यांच्यासारख्या चिरतारुण्याचे वरदान लाभलेल्या गायिकेस वयाची फूटपट्टी लावणे हा अपराधच म्हणायला हवा. सूर, संगीत आणि कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या मंगेशकर घराण्यात आशाताईंचा जन्म जरूर झाला. तथापि, त्यांची वाट म्हणावी तितकी सोपी नव्हती. गायन प्रवासाच्या खडतर पायवाटेवरील काटे वेचत आशाताईंच्या गळ्याने स्वरफुलांची सुंदर पखरण केली. मधाळ आवाजाची शिंपण करीत ‘हां हां’ म्हणता त्यांनी आपल्या ‘व्हर्सटाईल’ गायकीचा महामार्गच उभारला. भावगीत, नाट्य संगीत, लोकगीते, लावणी, शास्त्रीय संगीत, चित्रपट गीते, गझल, कव्वाली व इतकेच काय पाश्चात्त्य वळणाच्या पॉप संगीतापर्यंत गाण्यांचे कुठलेही क्षेत्र आशाताईंना वर्ज्य नव्हते. ठरावीक मूडचीच गाणी गाण्याचा अट्टाहास न धरता व आपल्या गळ्याला एका चौकटीत काेंडून न ठेवता आशाताईंनी सुरांची मनसोक्त उधळण केली व ती रसिकांनी डोक्यावर घेतली. स्वरसम्राज्ञी लतादीदींची धाकटी बहीण ही ‘सावली’ सतत सोबत वागवत असतानाही ‘आशा भोसले’ ही स्वतंत्र ओळख त्यांनी कष्टाने निर्माण केली. ‘मंगेशकर’ या विशाल वृक्षाच्या छायेखाली विसावून आपल्या
गायकीचा प्रवास
सीमित न करता आशाताईंनी तसाच एक स्वतःचा महाकाय वृक्ष निर्माण केला. आशाताईंच्या गळ्यातून उमटणारे खटके, लटके, मुरके आणि हरकती सुरांसोबत फेर धरू लागत तेव्हा मन घायाळ व कान तृप्त होत. ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’, ‘प्रभाती सूर नभी रंगती’, ‘उठा उठा सकळ जन’ यांसारखी अद्वितीय भक्तिगीते असोत, ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ यासारखे लहान मुलाच्या आवाजातील गाणे असो, ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ किंवा ‘एका तळ्यात होती…’ यांसारखी अफाट लोकप्रिय झालेली बालगीते असोत की ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘हाल पैसा है जनाब का’ यांसारखी तुफान लोकप्रिय झालेली युगलगीते असोत, आशा भोसले आयुष्यातील प्रत्येक वळणावर आबालवृद्धांना भेटल्यावाचून राहत नाहीत. ‘बुगडी माझी सांडली गं’सारखी फेटे उडविणारी लावणी असो, ‘उमराव जान’मधील प्रसिद्ध गझल असो, ‘आईये मेहरबाँ’सारखी मादक गाणी असोत, ‘पिया तू अब तो आजा’ यांसारखी उडत्या चालीची गाणी असोत की ‘जिवलगाsss’ अशी आर्त साद घालणारी विराणी, आशाताई गायनाच्या हरेक प्रकारात मुक्त विहार करीत राहिल्या. ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मी मज हरपून बसले गं’, ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ यांसारखी शृंगारगीते वा जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ हे स्फूर्तिगीत, अशी एक ना अनेक धाटणीची गाणी आशाताईंच्या गळ्यातून उमटली. वैविध्य हा आशा भोसलेंच्या समग्र गायकीचा स्थायीभाव. त्यांच्या आवाजातील फिरत रसिकांच्या मनाचा ठाव घेते. ‘का रे दुरावा, का रे अबोला’ या गाण्यातील त्यांचा सूर तर काळीज चिरून जातो. मीनाकुमारीपासून काजोलपर्यंत अशी एकही नायिका नाही जिच्यासाठी आशा भोसले गायल्या नाहीत. मृदू, मुलायम व मादक आवाजाची उपजतच देणगी लाभलेल्या आशाताईंची संगीत कलेतील कारकीर्द जेवढी बहारदार होती तेवढेच कटू प्रसंग त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आले. मात्र या
दुःखांना कुरुवाळत न बसता
त्या गात राहिल्या. हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामीळ, इंग्रजी अशा वीसहून अधिक भाषांमध्ये व एक हजाराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायिली. दत्ता डावजेकर, सुधीर फडकेंपासून अगदी अलीकडच्या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. ‘गदिमा’, जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे, सुरेश भट यांची शब्दसंपदा आशाताईंच्या गायकीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. ओ.पी. नय्यर, खय्याम, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, इलिया राजा, शंकर जयकिशन, इतकेच काय ए.आर. रेहमानपर्यंत साऱ्याच संगीतकारांना गायिका म्हणून आशा भोसलेच हव्या असायच्या. ‘इजाजत’मधील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘उमराव जान’मधील ‘दिल चीज क्या है…’ या गाण्यांनी तर रसिकांना वेडच लावले. या दोन्ही गाण्यांसाठी आशाताईंना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तब्बल सात वेळा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार त्यांच्या गाण्यांना मिळाला. मात्र, इतर गायकांना पुरस्कार जिंकण्याची संधी मिळावी म्हणून 1979 नंतर ‘यापुढे पार्श्वगायनाच्या पुरस्कारासाठी आपला विचार करू नये’, अशी विनंती करणारं मोठं मन आशाताईंकडे होतं. आशा भोसलेंनी गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या 16 हजारांच्या घरात आहे व सर्वाधिक गाणी गायल्याचीही नोंद ‘गिनीज बुक’नेदेखील ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’ म्हणून घेतली. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांवर आशा भोसले यांनी आपले नाव कोरले. जेमतेम दहा वर्षांच्या असताना पहिलं चित्रपटगीत गाणाऱ्या आशा भोसले गेली आठ दशके सुरांच्या दुनियेत मनसोक्त विहार करीत होत्या. ठरावीक मूडची लक्ष्मणरेषा त्यांनी आपल्या गायकीला कधीच घातली नाही. मखमली आवाजाची मलमली गायिका हीच आशा भोसले यांची ओळख होती. अष्टपैलू व सदाबहार गायिकेची ही स्वरगंगा आज पंचत्वात लुप्त होत असली तरी चंद्र, सूर्य, तारे असेतोवर ‘आशा भोसले’ हे नाव व त्यांचे सूर अजरामर राहतील. पृथ्वीलोकाचे हृदय जिंकणारा आवाज आज स्वर्गलोकी निघाला आहे. साक्षात सरस्वती असलेल्या गानसम्राज्ञी लतादीदी तेथील दारी धाकट्या बहिणीच्या स्वागतासाठी औक्षणाचे ताट घेऊन उभ्या असतीलच!






























































