सामना अग्रलेख – देवीच्या दरबारातील मृत्यू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या नालंदा येथे शीतलादेवीच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेमुळे देशातील धार्मिक स्थळांवरील गर्दी नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शीतलादेवीच्या दरबारात 9 महिलांचा पायाखाली तुडवले जाऊन तडफडून मृत्यू झाला. नालंदा विद्यापीठात दीक्षांत समारंभासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी 25 हजार पोलिसांचा बंदोबस्त, तर 10 हजार भाविकांच्या सुरक्षेसाठी मात्र एकही हवालदार नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असेल तर ते गंभीर आहे. दर्शन घेण्याच्या घाईतून ही चेंगराचेंगरी झाली असेल तर पुण्य कोणाला मिळाले? देवीच्या दरबारातील मृतांचा हा मूक सवाल आहे!

यात्रा व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारी अलोट गर्दी हा आता सुरक्षेच्या दृष्टीने मोठाच गंभीर विषय झाला आहे. देवाच्या दारात चेंगराचेंगरीच्या दुर्घटना वारंवार घडतात व असंख्य श्रद्धाळू भाविक मृत्युमुखी पडतात. मात्र अशा ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्याविषयी कुठलेही ठोस धोरण वा उपाययोजना नसल्यामुळे जुन्या दुर्घटना विस्मरणात जातात आणि पुनः पुन्हा निरपराध भाविकांचे चेंगराचेंगरीत बळी जातात. आताही तेच झाले आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात शीतलामाता मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली असताना भीषण चेंगराचेंगरी झाली व या दुर्घटनेत 9 महिलांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीत असंख्य लोक जखमी झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नालंदा जिल्ह्यातील मघडा या गावात शीतलादेवीचे जुने प्रसिद्ध मंदिर आहे. चैत्र महिन्यात दर मंगळवारी या मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. शिवाय दर मंगळवारी येथे यात्राही भरते. त्यामुळे केवळ नालंदा जिल्ह्यातूनच नव्हे तर राजधानी पाटणासह बिहारच्या अनेक भागांतून हजारो भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येतात. त्यात चैत्र महिन्यातील हा शेवटचा मंगळवार असल्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणापलीकडे गेली होती व सुरक्षेसाठी प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केली नव्हती. ना रांगेची शिस्त होती, ना गर्दीवर देखरेख ठेवणारे सुरक्षा रक्षक वा पोलीस कर्मचारी. प्रशासनाने 10 हजार भाविकांची गर्दी

शीतलादेवीच्या भरवशावर

सोडून दिली होती. मंदिर प्रशासनही गर्दीसमोर हतबल झाले होते. शीतलादेवीच्या दर्शनाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी जो तो एकमेकांना ढकलत गाभाऱ्याच्या दिशेने सरसावत होता. सगळय़ात आधी आपले दर्शन व्हावे, या हव्यासापायी आबालवृद्ध, महिला कुणाचाही मुलाहिजा न बाळगता भाविकांचे लोंढे गाभाऱ्याच्या दिशेने सुसाट निघाले व त्यामुळेच चेंगराचेंगरी सुरू झाली. दिसेल त्याला पायाखाली तुडवत, चिरडत मंदिरात शिरण्याचा प्रयत्न ही गर्दी करत होती. एकावर एक आदळून व शेकडो लोकांच्या पायाखाली तुडवले जाऊन असंख्य लोक बेशुद्ध पडले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची माहिती मिळून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत लोक तुडवले जात होते. पोलीस पोहोचेपर्यंत मंदिर परिसरात 8 महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. एक महिला नंतर रुग्णालयात मरण पावली. श्वास गुदमरल्याने मूर्छित अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या भाविक महिला व वृद्धांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. बिहार सरकारने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकांना सहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची औपचारिकता पूर्ण केली. पंतप्रधानांसह अनेकांनी या दुर्घटनेबद्दल शोक व सहवेदना व्यक्त केल्या. मात्र शब्दांच्या या बुडबुडय़ांनी चेंगराचेंगरीत हकनाक मरण पावलेल्या भाविकांचे जीव परत येणार आहेत काय? केवळ प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे देशात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनांचे सत्रच सुरू आहे. धार्मिक स्थळांवरील चेंगराचेंगरीचे प्रकार टाळण्यासाठी

खबरदारीची कुठलीच

उपाययोजना आखली जात नाही. दुर्घटना घडली की चौकशीची घोषणा आणि आर्थिक मदत जाहीर केली म्हणजे आपले कर्तव्य संपले, असे सरकारला वाटते. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात अशाच चेंगराचेंगरीत 100 वर भाविकांचे बळी गेले. मागे उत्तर प्रदेशातच हाथरस येथील सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 121 जण मरण पावले. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मांढरदेवी येथे तब्बल 300 भाविक चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडले होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही 2013 मध्ये नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चेंगराचेंगरी होऊन 19 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्याआधी केरळच्या आयप्पा मंदिरात 102 भाविकांचा चेंगराचेंगरीत बळी गेला. चार वर्षांपूर्वी जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिरातही 12 भाविक, तर 2008 साली राजस्थानच्या जोधपुरात चामुंडा देवीच्या मंदिरातील चेंगराचेंगरीत 250 भाविक मृत्युमुखी पडले होते. आता बिहारच्या नालंदा येथे शीतलादेवीच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेमुळे देशातील धार्मिक स्थळांवरील गर्दी नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शीतलादेवीच्या दरबारात 9 महिलांचा पायाखाली तुडवले जाऊन तडफडून मृत्यू झाला. नालंदा विद्यापीठात दीक्षांत समारंभासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी 25 हजार पोलिसांचा बंदोबस्त, तर 10 हजार भाविकांच्या सुरक्षेसाठी मात्र एकही हवालदार नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असेल तर ते गंभीर आहे. दर्शन घेण्याच्या घाईतून ही चेंगराचेंगरी झाली असेल तर पुण्य कोणाला मिळाले? देवीच्या दरबारातील मृतांचा हा मूक सवाल आहे!