
‘ऑपरेशन महादेव’, ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘ऑपरेशन गंगा-यमुना’ हे भावनिक खेळ मोदी काळात सुरू झाले व आमच्या सैन्याच्या पराक्रमाचे महत्त्व कमी झाले. प्रे. ट्रम्प सांगतात, ‘‘भारत-पाक युद्धात पाच जेट विमाने पडली.’’ संसदेत राजनाथ सिंह त्यावर बोलू शकले नाहीत. त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. भाजपमधले अनेक फुसके बार मोदी यांच्या युद्धनीतीचे कौतुक करतात तेव्हा त्यांची दया येते. जे पंतप्रधान वैचारिक मतभेद झाले म्हणून देशाच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊ शकतात, तेच पंतप्रधान पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत या सगळ्यांचे वाभाडे निघाले याची नोंद इतिहासात राहील. या सगळ्यांचे ‘कोर्ट मार्शल’च व्हायला हवे.
भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती म्हणजे निव्वळ ढोंग आहे. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असताना कश्मीर खोऱ्यात तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातल्याची बातमी झळकवली. यातील एक सुलेमान म्हणे पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड होता. यावर आता कोणी विश्वास ठेवील काय? लोकांचाच सरकारवरील विश्वास उडाला आहे. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर विरोधी पक्षांच्या तोफा धडाडत असताना त्या टीकेची धार कमी करण्यासाठी ही मारून मुटकून सुलेमानसारखी प्रकरणे घडविण्यात सरकारचा हातखंडा आहे. लोकसभेत सरकारचे वाभाडेच निघाले. असदुद्दीन ओवेसी यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचाच आहे. ओवेसी म्हणाले, ‘‘सरकार पहलगाममध्ये मारलेल्या 26 लोकांच्या घरी जाऊन हे सांगू शकेल काय, की आम्ही बदला घेतला आहे, आता भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच तुम्ही पाहू शकता?’’ ओवेसी यांचा सवाल बिनतोड आहे. ‘‘पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही’’ असा इशारा मोदी यांनी पाकड्यांना दिला होता, पण जय शहा यांच्या कृपेने भारत-पाक क्रिकेटचे सामने मात्र होणार आहेत. यावर अमित शहांचे काय म्हणणे आहे? लोकसभेत सरकारचे वाभाडे निघाले व पंतप्रधान उंटावरून शेळ्या हाकत फिरत होते. काँग्रेसचे गौरव गोगोई, शिवसेनेचे अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, ओवेसी यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले व ही भाषणे पंतप्रधान बंद खोलीत बसून ऐकत होते. राजनाथ सिंह, जयशंकर यांनी उत्तम भाषण केल्याचे पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर सांगितले. मग विरोधी नेत्यांचे कौतुक करायला त्यांच्यातली लोक‘शाई’ संपली काय? पंडित नेहरूंच्या नखाची सरही या आजच्या पंतप्रधानांना येणार नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’चा या लोकांनी
राजकीय तमाशा
केला. अमित शहा म्हणत होते, ‘‘पीओकेसाठी प्राणांचे बलिदान देऊ.’’ योगी आदित्यनाथ गर्जत होते, ‘‘मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर सहा महिन्यांत पीओकेला भारताचा हिस्सा बनवू.’’ आणि काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ताव मारत सांगितले, ‘‘पीओकेवर ताबा मिळवणे हा आमचा उद्देश कधीच नव्हता.’’ असे सांगणाऱ्या संरक्षण मंत्र्यांचे भाषण जोरदार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ‘‘पीओकेसाठी मरण पत्करू’’ अशा वल्गना करणारे पीओके भारतात विलीन करण्याची संधी आली तेव्हा रणमैदानातून पळाले व क्रिकेटच्या मैदानात जाऊन पाकड्यांशी खेळू लागले. हा राष्ट्रद्रोह आहे व अशा लोकांवर कोर्ट मार्शल व्हायला हवे. ‘‘भारत-पाक युद्धात आम्ही जिंकलो’’ असे नारे ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी संसदेत दिले, पण त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव नव्हते व अंगात जोश नव्हता. विजयानंतर जो गडगडाट व्हायला हवा, विजांचा जो तेजस्वी कडकडाट व्हायला हवा, तो तर कोठेच दिसला नाही. या विजयाची तुलना आम्ही महाराष्ट्रातल्या ‘भाजप’ विजयाशीच करू शकतो. महाराष्ट्रात भाजप प्रचंड संख्येने जिंकला. त्या विजयाचा जल्लोष ना राज्यात ना लोकांत दिसला. ‘आम्ही विजयी झालो’ असे ढोल हेच पाच-पन्नास लोक वाजवताना दिसतात. महाराष्ट्रातला विजय हा काही लोकमताचा कौल नाही. त्यामुळे विजयी होऊनही त्यांची तोंडे काळवंडलेली आहेत. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भाजप पुढाऱ्यांचे झाले आहे. विजयी झाल्याची कोणतीही लक्षणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. महात्मा गांधींनी सांगितले होते, ‘‘ताकद, आत्मविश्वास शारीरिक शक्तीतून येत नाही, तर अदम्य इच्छाशक्तीतून निर्माण होतो.’’ या
अदम्य इच्छाशक्तीचाच अभाव
सर्वत्र दिसतो. पंतप्रधान मोदी यांनी प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन पाकबरोबरचे युद्ध थांबवले. प्रे. ट्रम्प यांनी हा दावा आतापर्यंत 30 वेळा केला. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असतानाही प्रे. ट्रम्प यांनी पुन्हा जाहीर केले की, ‘‘भारत-पाक युद्ध मी आणि मीच थांबवले. व्यापाराची धमकी देऊन थांबवले.’’ प्रे. ट्रम्प यांना उत्तर देण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांनी दाखवली नाही हे विशेष. ‘दहशतवाद आणि व्यापार एकत्र कसा होणार’? असा प्रश्न मोदी ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी करत होते, पण त्याच व्यापाराच्या प्रलोभनात मोदी यांनी पाकड्यांबरोबरचे दहशतवादाविरुद्धचे युद्ध थांबविले. हा त्या ‘सिंदूर’ पुसलेल्या महिलांचा अपमान आहे. युद्धातही या लोकांनी भावनिक राजकारण आणि हिंदुत्व आणले. भारतात ‘ऑपरेशन विजय’, ‘ऑपरेशन पराक्रम’, ‘ऑपरेशन पोलो’, ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाखाली यशस्वी युद्धे लढली गेली, पण ‘ऑपरेशन महादेव’, ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘ऑपरेशन गंगा-यमुना’ हे भावनिक खेळ मोदी काळात सुरू झाले व आमच्या सैन्याच्या पराक्रमाचे महत्त्व कमी झाले. प्रे. ट्रम्प सांगतात, ‘‘भारत-पाक युद्धात पाच जेट विमाने पडली.’’ संसदेत राजनाथ सिंह त्यावर बोलू शकले नाहीत. त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. भाजपमधले अनेक फुसके बार मोदी यांच्या युद्धनीतीचे कौतुक करतात तेव्हा त्यांची दया येते. जे पंतप्रधान वैचारिक मतभेद झाले म्हणून देशाच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊ शकतात, तेच पंतप्रधान पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत या सगळ्यांचे वाभाडे निघाले याची नोंद इतिहासात राहील. या सगळ्यांचे ‘कोर्ट मार्शल’च व्हायला हवे.