सामना अग्रलेख – ‘बर्ड फ्लू’चा ‘अलार्म’!

आतापर्यंत बर्ड फ्लू म्हणजे कोंबडय़ा आणि इतर पाळीव पक्षी असे समीकरण होते. मात्र आता देशाच्या राजधानीतच बर्ड फ्लूने पहिला बळी घेतल्याने बर्ड फ्लू आणि माणूस असेही समीकरण होण्याचा धोका आहे. दिल्लीत बर्ड फ्लूने जो ‘अलार्म’ वाजविला आहे त्याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य यंत्रणेने आताच खडबडून जागे व्हावे. कोरोना जसा ‘टाळय़ा आणि थाळय़ां’नी गेला नाही तसा बर्ड फ्लूदेखील जाणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या आता कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. म्हणजे कोरोनाचे भूत आजही आपल्या अवतीभवतीच फिरत आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे देशात पहिला मृत्यू झाल्याची ही बातमी काळजाचा ठोका चुकविणारीच आहे. एका 11 वर्षीय मुलाचा दिल्लीत बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. ताप आणि खोकला ही लक्षणे असलेल्या या मुलाला कोरोना संसर्ग झाला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र सगळे चाचणी अहवाल आल्यानंतर त्याला कोरोना नसल्याचे लक्षात आले आणि ‘एविएन एन्फ्लुएन्झा’ म्हणजे बर्ड फ्लू झाल्याचे निदान झाले. दुर्दैवाने 20 जुलै रोजी या मुलाचा मृत्यू झाला. आता त्याच्यावर उपचार करणारे, त्याच्या संपर्कात आलेले अशा सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असले आणि सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि बर्ड फ्लूचा देशातील पहिला मृत्यू चिंता वाढविणाराच आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे थैमान देशात सुरू आहे. चार लाखांवर बळी या महामारीने घेतले आहेत. त्याच्या

दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून

सरकारी यंत्रणा आणि जनता अद्यापि नीट सावरलेली नाही. कोरोना रुग्णसंख्या घटलेली असली तरी कोरोना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यात ‘झिका’ विषाणू, कोरोनाचाच ‘डेल्टा प्लस’ आणि आणखी काही व्हेरिएंट काळजी वाढवीत आहेत. एका महिलेला कोरोनाच्या दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे दोनच दिवसांपूर्वी आढळून आले आहे. कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गंभीर आजाराचा धोका कमी असला तरी कोरोना संसर्गापासून ते मुक्त नसल्याने त्यांच्यावरही भीतीचे सावट आहेच. त्यात आता ‘बर्ड फ्लू’च्या धोक्याची भर पडली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीही महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक दिसून आला होता. अनेक ठिकाणी कोंबडय़ाच नव्हे तर इतर पक्ष्यांचेही मोठय़ा संख्येने मृत्यू झाले होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठय़ा संख्येने कोंबडय़ा मारण्यात आल्या होत्या. बर्ड फ्लूने माणसाचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी समोर आले नव्हते तरी या रोगाच्या भीतीमुळे अनेक राज्यांतील

‘पोल्ट्री’ व्यवसायावर

मोठे गंडांतर आले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. मागील दोन-तीन दशकांत बर्ड फ्लूने आपल्या देशात चार-पाच वेळेस तरी डोके वर काढले, पण त्याचा धोका कोंबडय़ा आणि पक्ष्यांपुरताच मर्यादित होता. आतापर्यंत बर्ड फ्लू म्हणजे कोंबडय़ा आणि इतर पाळीव पक्षी असे समीकरण होते. मात्र आता देशाच्या राजधानीतच बर्ड फ्लूने पहिला बळी घेतल्याने बर्ड फ्लू आणि माणूस असेही समीकरण होण्याचा धोका आहे. कोरोनाप्रमाणेच बर्ड फ्लूच्या जगातील पहिल्या मानवी संसर्गाची बातमी जूनच्या पहिल्या आठवडय़ात चीनमधूनच आली होती. हे सर्व चीनमध्येच प्रथम का घडते आणि नंतर ते संकट जगात थैमान का घालते, हा गंभीर प्रश्न नक्कीच आहे. मात्र तूर्त दिल्लीत बर्ड फ्लूने जो ‘अलार्म’ वाजविला आहे त्याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य यंत्रणेने आताच खडबडून जागे व्हावे. कोरोना जसा ‘टाळय़ा आणि थाळय़ां’नी गेला नाही तसा बर्ड फ्लूदेखील जाणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या