आजचा अग्रलेख : आज देशकार्य, शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मतदान करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच वर्षांत मुंबई, दिल्लीसारख्या शहरांकडे कुणाची वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. ही भीती दिल्लीतील राष्ट्रवादी मोदी सरकारची आहे. ही भीती राहिली तरच देश सुरक्षित राहील. म्हणूनच मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावायला हवा. देशाच्या दुष्मनांना पराभूत करण्यासाठी लोकहो, मतदान करा! देशाच्या व तुमच्या–आमच्या रक्षणासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले अशा शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मतदान करा. मोदी ‘बुलेट’ने देशद्रोह्यांशी लढतील, लढणाऱ्या मोदींना आपण सगळे ‘बॅलेट’ने पाठिंबा देऊया. यापेक्षा मोठे देशकार्य नाही!

प्रचाराच्या तोफा थंड पडून मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक, धुळे, नंदुरबार, दिंडोरी  अशा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. साईबाबांच्या शिर्डीतही मतदार राजा आज कौल देणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघदेखील मतदानासाठी सज्ज आहेत. महाराष्ट्रात एकूण 17 तर देशात नऊ राज्यांमध्ये 71 मतदारसंघांत या चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजधानीकडे, मुंबईकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशाच्या आर्थिक नाडय़ा येथे आहेत. सामान्य, मध्यमवर्गीयांचे अनेक प्रश्न या नाडय़ांत आवळले गेले आहेत. तरीही याच मध्यमवर्गीय लोकांनी मुंबईसारखी शहरे श्रम करून व घाम गाळून जितीजागती ठेवली आहेत. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात रांगा लावून घंटा बडवणाऱ्यांना व देवत्व घेणाऱ्यांना अनेकदा घाम फोडणारा हाच वर्ग आहे. उच्चभ्रू वर्गात मतदानाचा उत्साह कसा घसरू लागला आहे ते ज्ञानी व सदैव ‘शहाण्या’ पुणेकरांनी दाखवून दिले. संधी असते तेव्हा मतदान करायचे नाही व नंतर सर्वच राजकारण्यांच्या नावाने खडे फोडायचे या ‘राष्ट्रीय’ कार्यात बोटावर शाई लावून न घेणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. आम्ही विज्ञानात भरारी घेतली म्हणजे अंतराळात यान सोडले, पण कोटय़वधी जनतेला मतदानासाठी जागरूक करू शकलो नाही हे जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल! एका बाजूला मोठा वर्ग मतदान करीत नाही, तर दुसऱ्या बाजूला मतदान विकत घेण्याची कला लोकशाही मंदिराच्या पुजाऱ्यांना साध्य झाली आहे. पुन्हा जे लोक तुमच्या लोकशाहीच्या नावाने सर्वाधिक घंटा बडवत असतात त्यांनाच निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना पैसे वाटावे लागतात. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ कुमार यांच्या मंडळींना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडल्याची घटना लाजिरवाणी आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे लोकशाही धोक्यात आहे व मोदी पुन्हा सत्तेवर आले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत अशी भाषणे करणाऱ्यांच्या घरातले हे प्रताप आहेत आणि हा पैशांचा खेळ भयंकर आहे. ‘नोटाबंदी’नंतरही विरोधकांच्या हाती चांगलीच रोकड आहे व निवडणुकीत त्या रोकडीचा धूर निघत आहे. देशात सर्वत्रच हे प्रकार घडत आहेत. मुळात आपल्या देशात निवडणूक हीच

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांची गंगोत्री

आहे. त्यामुळे आधी ही गंगा साफ केली पाहिजे व त्यानंतर काशी-

वाराणसीमधील गंगेच्या शुद्धीकरणाकडे पाहायला हवे. नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने आम्ही वाराणसीत गेलो, गंगादर्शन झाले, पण मोदी यांना अभिवादन करण्यासाठी जो प्रचंड ‘गंगासागर’ वाराणसीच्या रस्त्यांवर उसळला होता, त्याचे वर्णन करताना शब्द तोकडे पडतील. हिंदुत्वाची ती विराट यात्रा पाहून आम्हाला शिवसेनाप्रमुखांची आठवण झाली. शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच जनतेचे प्रचंड प्रेम पंतप्रधान मोदी यांना लाभले आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात आज तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही. 2014 ची लोकसभा निवडणूक मोदी यांच्याभोवती फिरत होती व 2019 ची निवडणूक मोदी यांच्या मुठीत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एकजुटीची ही वज्रमूठ असून या वज्रमुठीच्या दणक्याने निकालाआधीच विरोधकांचे दात घशात गेले आहेत. वाराणसीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्वच प्रमुख नेते हजर होते. अकाली दलाचे वयोवृद्ध नेते प्रकाशसिंग बादलसुद्धा होते. मोदी यांनी त्या दालनात प्रवेश करताच बादल यांच्या पायास हात लावून आशीर्वाद घेतले. हे संस्कार राहुल गांधी किंवा अन्य विरोधी नेत्यांकडे आहेत काय? उलट यूपीएच्या कार्यकाळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांना अनेकदा अपमानित व्हावे लागले. मनमोहन सिंग यांच्या निर्णयाचे कागद जाहीर व्यासपीठावरून फाडण्याचे प्रताप राहुल गांधी यांनी केले. गांधी घराणे म्हणजे देशाचे रक्त शोषणाऱ्या पिसवा आहेत. ‘गरिबी हटाव’च्या घोषणा करून वारंवार मते घेतली. जाती आणि धर्माचे राजकारण करणे हा तर त्यांचा पिढीजात धंदाच आहे. तीन-चार दशके देशावर याच घराण्याने राज्य केले, पण ना गरिबी हटली ना देशाची धड प्रगती झाली. आजही देशातील हजारो खेडय़ांत धड पिण्याचे पाणी नाही. घोटभर पाण्यासाठी आया-बहिणींची, पोराबाळांची भटकंती थांबता थांबत नाही. बेरोजगारीचा दर 45 वर्षांत सर्वात जास्त असल्याचा आरोप विरोधक करतात तेव्हा त्यांनी एक प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा तो म्हणजे गेल्या पाच वर्षांवर त्याचे खापर फोडण्याआधी मागच्या 45 वर्षांत रोजगाराच्या प्रश्नावर

काँग्रेस व त्यांच्या बगलबच्च्यांनी

काय दिवे लावले? बेरोजगारीचा हा स्फोट कुणामुळे झाला याचे उत्तर

मिळायला हवे. कश्मीरातील तरुणांच्या हाती दगड आहेत व हे दगड ते दुर्दैवाने आपल्याच सैनिकांवर फेकत आहेत याचे कारण त्या तरुणांच्या रिकाम्या हातांना काम देण्यासाठी 45 वर्षांत काहीच झाले नाही. कश्मीरातील 370 कलम हे विकासातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. कश्मीरात उद्योग-व्यवसाय वाढवायचा असेल तर 370 कलमाचा बंद दरवाजा फोडून संपूर्ण देशाला आत घुसावे लागेल. तिथे ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणांना बळ द्यावे लागेल, पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमकी विरुद्ध भूमिका घेऊन देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या कार्यास हरताळ फासला आहे. देशद्रोहास गुन्हा मानणारे कलम ढिले करू असे राहुल गांधी सांगतात. म्हणजे तिरंगा जाळणाऱ्यांना, घटना तुडवणाऱ्यांना, ‘‘हिंदुस्थानचे तुकडे तुकडे करू’’ असे जाहीरपणे बोलणाऱ्यांना अभय मिळेल. सैनिकांच्या शौर्यावर शंका घेणाऱ्यांना मत म्हणजे पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा हे मतदारांनी विसरू नये. बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन करणाऱ्या ममता बॅनर्जी, पाकिस्तानविषयी पान्हा फुटलेला आझम खान, ‘‘देशात दोन पंतप्रधान हवेत’’ अशी गरळ ओकणारे फारुख अब्दुल्ला, हिंदुस्थानातून फुटण्याची भाषा करणारी मेहबुबा मुफ्ती एका बाजूला आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला लावून हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचवणारे मोदी दुसऱ्या बाजूला आहेत. बाजूच्या श्रीलंकेत बॉम्बस्फोट मालिकांमुळे नरसंहार झाला आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबई, दिल्लीसारख्या शहरांकडे कुणाची वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. दहशतवादी एका भयाने बिळात लपून बसले. ही भीती दिल्लीतील राष्ट्रवादी मोदी सरकारची आहे. ही भीती राहिली तरच देश सुरक्षित राहील. म्हणूनच मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावायला हवा. देश सुरक्षित ठेवण्यासाठी आजचे मतदान आहे. देशाच्या दुष्मनांना पराभूत करण्यासाठी लोकहो, मतदान करा! देशाच्या व तुमच्या-आमच्या रक्षणासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले अशा शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मतदान करा. मोदी ‘बुलेट’ने देशद्रोहय़ांशी लढतील, लढणाऱ्या मोदींना आपण सगळे ‘बॅलेट’ने पाठिंबा देऊया. यापेक्षा मोठे देशकार्य नाही!