
‘पालघरमधील साधू हत्याकांडाने हिंदुत्वाला धक्का बसला’ वगैरे बालिश विधाने त्या वेळी करणाऱ्या भाजप नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आता त्याच हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या काशीनाथ चौधरी यांना या मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश दिला. या नीचपणासाठी मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागून प्रायश्चित्त घ्यायला हवे. विषय काशीनाथ चौधरींचा नसून भाजपची नियत किती सडकी आहे याचा आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप आणखी किती खुन्यांना, दहशतवाद्यांना, आर्थिक गुन्हेगारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घुसळून बाहेर काढणार आहे? भाजप म्हणजे हिंदुत्वाला लागलेला खोडकिडा आहे. पालघरचे मृत साधू भाजपला शापच देतील!
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना भाजपच्या हिंदुत्वास विषारी उकळी फुटली होती. त्या विषारी उकळीत पालघर साधू हत्याकांडाचा समावेश करावा लागेल. पाच वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात चिन्मयानंद स्वामी आणि स्वामी सुशीलगिरी महाराज या दोन साधूंची हत्या डहाणूतील गडचिंचले गावात झाली होती. संपूर्ण गाव या हत्याकांडात सहभागी होते. त्याआधी काही दिवस गावात मुले पळवणारी टोळी येत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे संपूर्ण गाव या टोळीचा समाचार घेण्यासाठी दिवस-रात्र जागे होते. अशात एका संध्याकाळी हे दोन साधू गावात शिरले. गावकऱ्यांनी त्यांना घेरले व मारहाण करून ठार केले. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता व संपूर्ण गडचिंचले गावावरच गुन्हा नोंदवून कारवाईला सुरुवात झाली. यात हिंदुत्व खतऱ्यात आल्याची कोणतीही भूमिका नव्हती, पण महाराष्ट्रात त्या वेळी ‘ठाकरे’ सरकार असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने साधू हत्याकांड केल्याचे भोंगे दिल्लीपासून काशीपर्यंत वाजू लागले. महाराष्ट्रात भाजपने साधूंच्या समर्थनार्थ मोर्चे, आंदोलने सुरू केली. या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार काशीनाथ चौधरी यांना फाशी देण्याची मागणी भाजपने केली. आता आश्चर्य असे की, साधू हत्याकांडात ज्यांना फाशी द्यावी अशी मागणी केली, त्या काशीनाथ चौधरींना भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून ‘स्वच्छ’ केले आणि भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी साधू हत्याकांडातील आरोपीच्या भाजप प्रवेशासाठी पायघडय़ाच अंथरल्या आहेत. साधू गेले जिवानीशी, पण आमचे राजकारण आम्ही करणार, असे एकंदर
भाजपचे धोरण
दिसते. काशीनाथ चौधरी हे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यामुळे साधू हत्याकांडाचे शिंतोडे शरद पवारांवरही उडवले गेले होते. हेच काशीनाथ चौधरी विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेच्या दारातही आलेच होते, पण साधू हत्याकांडाचा ठपका असलेल्यांना उमेदवारी देण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता. हिंदू म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली, पण आता पालघर जिल्ह्यात भाजपला बळ मिळावे म्हणून चौधरी यांना भाजप प्रवेश दिला जात असेल तर तो नीचपणा आहे. राजकीय स्वार्थासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी भाजप किती नीच पातळीवर जाऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. आता सर्वत्र बोंबाबोंब झाल्याने चौधरी यांच्या भाजप प्रवेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली, पण भाजपची पुरती बेअब्रू व्हायची ती झालीच आहे. भाजपचे अलीकडचे सर्वच पक्ष प्रवेश हे वादग्रस्त ठरले आहेत. दाऊद, सलीम कुत्ताचे हस्तक म्हणून ज्यांच्या विरोधात बोंबा मारल्या त्यांना भाजपवाल्यांनी पक्ष प्रवेश देऊन एक प्रकारे दाऊद इब्राहीमसाठीही लाल गालिचा अंथरला आहे. एवढा हा पक्ष खालच्या थराला गेला आहे. सर्व खुनी, दरोडेखोरांना, भ्रष्टाचाऱ्यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांचा पक्ष ‘मजबूत’ आणि ‘पवित्र’ केला. 2020 मध्ये पालघरात जेव्हा साधू हत्याकांड झाले तेव्हा तपासासाठी गृह मंत्रालयाने दिल्लीहून पथके पाठवली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देवेंद्र फडणवीस यांनी साधू हत्येबद्दल छाती पिटण्याचा जाहीर कार्यक्रम केला. महाविकास आघाडीचे सरकार हिंदूविरोधी असल्याचा तांडवी नाच ठिकठिकाणी झाला. प्रत्यक्षात साधूंना मारणारे हे आदिवासी व अंधश्रद्धाळू होते. त्याच अंधश्रद्धेतून साधूंची हत्या झाली. हत्या झाली तेव्हा काशीनाथ चौधरी घटनास्थळी होते. त्यामुळे त्यांना आरोपी क्रमांक एक करून फाशी द्या ही भाजपची मागणी होती. आता साधू हत्याकांडातील आरोपी क्रमांक एकला वाजत गाजत
भाजपमध्ये सामील केले
केले. या अचाट हिंदुत्ववादी कार्याबद्दल डहाणूतील जनतेने मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कारच करायला हवा. चौधरी यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने पालघरमध्ये हत्या झालेल्या साधूंच्या आत्म्यास शांती लाभेल व हिंदुत्वास बळकटी मिळेल असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटते काय? फडणवीस गृहमंत्रीदेखील आहेत. मग आता साधू हत्याकांडातील आरोपी क्रमांक एकलाच भाजपमध्ये प्रवेश दिल्याने संपूर्ण खटलाच जमीनदोस्त होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी द्यायला हवे. हा सगळाच प्रकार म्हणजे कायद्याची व सत्तेची मनमानी आहे. गृहमंत्री फडणवीस ही मनमानी उघडपणे करत आहेत. फाशीच्या गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन निर्दोष सिद्ध करायचे, हा नवा पायंडा घातक आहे. ‘पालघरमधील साधू हत्याकांडाने हिंदुत्वाला धक्का बसला’ वगैरे बालिश विधाने त्या वेळी करणाऱ्या भाजप नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आता त्याच हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या काशीनाथ चौधरी यांना या मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश दिला. या नीचपणासाठी मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागून प्रायश्चित्त घ्यायला हवे. विषय काशीनाथ चौधरींचा नसून भाजपची नियत किती सडकी आहे याचा आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप आणखी किती खुन्यांना, दहशतवाद्यांना, आर्थिक गुन्हेगारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घुसळून बाहेर काढणार आहे? भाजप म्हणजे हिंदुत्वाला लागलेला खोडकिडा आहे. पालघरचे मृत साधू भाजपला शापच देतील!
































































